देवराईतील १८० देशी औषधी प्रजाती व आंबा कलमे जळून खाक

आचरा टेंबलीवरील येतील घटना, पाईपलाईनचेही मोठे नुकसान
आचरा टेंबली येथे लागलेल्या भीषण आगीत निलेश सरजोशी यांच्या देवराई–प्लांट प्रकल्पाला मोठा फटका बसला असून सुमारे ६ ते ७ एकर क्षेत्र बाधित झाले आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात एकूण १० एकरांवर सुमारे १८० देशी औषधी वनस्पतींचे संवर्धन करण्यात येत होते. आगीत मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचे अपरिमित नुकसान झाले आहे.
लहान औषधी वनस्पतींचा सर्वाधिक फटका बसला असून अश्वगंधा, सर्पगंधा, मुसळी, नडसांघी, कोरफड, ब्राह्मी, शतावरी, गुग्गुळ, एरंड, अडुळसा, निगडी यांसारख्या बहुमोल प्रजाती पूर्णतः नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच कडुलिंब, आवळा, अर्जुन, हादगा, बेल यांसारखी मध्यम आकाराची झाडे होरपळली असून वड, पिंपळ, पायर, जांभूळ, आईन, किरोर, सावर, बाबू यांसारख्या महावृक्षांनाही आगीचा फटका बसला आहे. फुलझाडांमध्ये जास्वंद, सदाफुली, कांचन तसेच लिंबूवर्गीय झाडांचेही मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच आंबा कलमेही जळून खाक झाली आहेत.
आगीत पाईप जळून खाक
आगीत पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली पाईपलाईन पूर्णतः जळाली असून सुमारे ३० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेला महत्त्वाचा प्रकल्प धोक्यात आला असून पुनर्लागवड व नुकसानभरपाईसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
दरवर्षी या भागात आग लागण्याचे प्रकार घडत असून स्थानिक शेतकरी व आंबा बागायतदार हतबल झाले आहेत. आचरा पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात कलमबागा आहेत; मात्र आग लागल्यावर मालवण किंवा देवगड येथील अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागते. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठे नुकसान होते. त्यामुळे आचरा पंचक्रोशीसाठी स्वतंत्र अग्निशमन गाडीची मागणी जोर धरत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणेकडून पंचनामा व चौकशी सुरू आहे.





