सिंधुदुर्गच्या ‘आत्मव्रतम्’ चा आंतरराष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिवल मध्ये डंका

तृतीय क्रमांकासह लघुपटास इतर दोन मानाची पारितोषिके

ऍड. समीरा प्रभू सर्वोत्कृष्ट पटकथाकार, हर्षद जोशी उत्कृष्ट ध्वनी संयोजक

मध्यप्रदेश मधील उज्जैन येथे सोमवारी झालेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय संस्कृत शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ‘आत्मव्रतम्’ या संस्कृत शॉर्ट फिल्मने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. स्वदेशी या आशय गर्भ विषयावर आधारित या लघुपटाला तृतीय क्रमांकाचे मानाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच वैयक्तिक पुरस्कारात उत्कृष्ट पटकथेकरिता केळूस येथील ऍड. समीरा संदेश प्रभू आणि उत्कृष्ट ध्वनी संयोजनासाठी हर्षद जोशी यांना सन्मानित करण्यात आले.
उज्जैन येथे झालेल्या शानदार पारितोषिक वितरण समारंभात या लघुपटाच्या विजेत्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण उज्जैन नगर पालिकेच्या अध्यक्ष श्रीमती कलावती यादव, राज्यसभा खासदार उमेशनाथ जी महाराज, कालिदास संस्कृत अकादमीचे निदेशक डॉ. गोविंद गंधे, अभिनेत्री श्रीमती ऐश्वर्या शर्मा, अभिनेता श्रीमान युवराज सिंग, संस्कृत भारतीचे क्षेत्रीय अध्यक्ष प्रो. विरुपाक्ष वी. जद्दीपाल यांच्या उपस्थितीत झाले.
स्वदेशी विचारसरणीचा वैदिक संस्कृतिक संबंध जपत साकारलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन लेखन आणि निर्मिती जबाबदारी केळूस-कुडाळ येथील ऍड. समीरा संदेश प्रभू यांनी समर्थपणे सांभाळली. लघुपटाचे चित्रीकरण आणि संकलन कुडाळ येथील छायाचित्रकार अनिल रवींद्र पाटकर यांनी केले आहे. या संस्कृत शॉर्ट फिल्ममध्ये प्रीती गोलम, प्रवीण गोलम, प्रथमेश गोलम, राहुल जोशी, वरद जोशी आणि अवनी अवसरे यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने या लघुपटला अधिक उंची प्रदान केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या या यशामुळे जिल्ह्यातील सर्जनशील क्षमतेचा गौरव झाला आहे.

error: Content is protected !!