तेंडोली-गावठाणवाडी शाळेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचा पाठपुरावा
कुडाळ तालुक्यातील तेंडोली – गावठणवाडी जि. प. प्राथ. शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत शिंदे शिवसेनेचे तेंडोली उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून आमदार नीलेश राणे यांचे लक्ष वेधले. आमदार श्री. राणे यांनी तातडीने गंभीर दखल घेत तत्परता दाखविली. आमदार राणे आणि जिल्हाप्रमुख सामंत यांच्या माध्यमातून तात्काळ शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून आजपासून प्रत्यक्षात कामालाही सुरूवात झाली आहे,अशी माहिती श्री. राऊळ यांनी दिली.
या शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याची घटना ९ जानेवारी रोजी घडली होती. त्यानंतर संबधीत प्रशासनाने विद्यार्थ्यांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या गंभीर प्रकाराची प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालकांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मुलांना शाळेसमोरील अंगणात भर उन्हात शाळा भरवित आंदोलन छेडले होते. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत पालकांशी चर्चा करीत शाळेचे छप्पर दुरुस्त होईपर्यंत मुलांना तात्पुरते खासगी मालकीच्या इमारतीत बसविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता.
त्यानुसार खासगी इमारतीत मंगळवारपासून शाळा सुरु करण्यात आली. मात्र घडलेल्या घटनेची माहिती आमदार श्री. राणे यांना देण्यात आली. श्री. राणे यांनी गंभीर दखल घेत इमारतीच्या छपराबाबत आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यानुसार शाळेला लोखंडी अँगल, पत्रे आदी छप्पराचे साहित्य पुरविण्यात आले. आजपासून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करण्यात आली आहे. शाळेच्या दुरुस्तीसाठी तात्काळ पावले उचलल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी श्री.राणे यांचे आभार मानले.





