प. पू. भालचंद्र महाराज संस्थान तर्फे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा जन्मोत्सवामध्ये भव्य सत्कार

खारेपाटणच्या बाल कलाकारांमुळे कणकवलीचे नाव देशपातळीवर

NCERT दिल्ली व SCERT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे ( यशदा ) येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कलाउत्सव स्पर्धा – 2025 मध्ये लोकसंगीत समूह वाद्य वादन या कला प्रकारामध्ये संगीत शिक्षक संदिप पेंडुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या विद्यालयाचा देशामध्ये प्रथम क्रमांक आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तसेच, कणकवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या अभुतपुर्व यशाबद्दल प. पू. भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली यांच्यातर्फे भालचंद्र महाराज यांच्या १२२ व्या जयंती महोत्सवामध्ये मार्गदर्शक संगीतशिक्षक संदिप पेंडुरकर व राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते विद्यार्थी आयुष प्रशांत मांगले, आर्या अनिल मोसमकर, सुमित रवींद्र ठोसर व वंश मारुती कानडे तसेच, या संघाला विशेष सहकार्य करणारे श्रीधर पाचंगे यांचा विशेष सत्कार व सन्मान करण्यात आला. या प्रसंगी संस्थान चे विश्वस्त प्रसाद अंधारी, भरत उबाळे, गजानन उपरकर, सुधीर सावंत ( मुंबई ), काशिनाथ कसालकर, नागेश मुसळे, व्यवस्थापक श्री. विजय केळुसकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण हायस्कूलच्या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण कणकवली तालुक्याची मान उंचावली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांची खाण आहे. अनेक बाल संगीत रत्ने या भूमीमध्ये आहेत. त्यांना शोधून त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्याचे काम, त्यांच्या कलेला पैलू पाडण्याचे महत्त्वपूर्ण व अवघड काम संदिप पेंडुरकर सर करत आहेत. त्यांचे खुप मोठे योगदान या यशामध्ये आहे, असे गौरवपूर्ण उद्गार विश्वस्त श्री. गजानन उपरकर यांनी काढले. याप्रसंगी भालचंद्र महाराज यांचे राज्यभरातून आलेले अनेक भक्तगण व कणकवलीतील संगीत रसिक उपस्थित होते.

error: Content is protected !!