शिक्षक सर्वांगीण ज्ञान देणारा असावा : डॉ. संजीव आकेरकर

बॅ. शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांचे स्नेहसंमेलन
शिक्षक नुसता पुस्तकी ज्ञान देणारा नसावा, तर त्याबरोबर सर्वांगीण ज्ञान देणारा असावा. विद्यार्थ्यांमधील भीती दूर करून सुप्त गुणांना पुढे आणणारा असावा. असे प्रतिपादन डॉ. संजीव आकेरकर यांनी केले. बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीएड कॉलेज व बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रामधील एम ए शिक्षण शास्त्र, एम ए योगा, शालेय व्यवस्थापन पदविका, योग शिक्षक पदविका व बहिस्थ बीएससी या शिक्षणक्रमातील विद्यार्थ्यांच्या ‘स्नेहबंध’ या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व यशवंतराव चव्हाण, शारदा माता, शिवछत्रपती, यांच्या प्रतिमेच्या पूजनानने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, बॅ. नाथ पै बीएड कॉलेजचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख परेश धावडे, बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख अरुण मर्गज, केंद्र समन्वयक नितीन बांबर्डेकर, ऍडव्होकेट विवेक मांडकुलकर,नागेश कदम, डॉ. सतीश तेरसे, डॉ. संगीता तुपकर, प्रा.रिध्दी पाताडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अकेरकर पुढे म्हणाले, पुढील शिक्षण घेत शिकवण्यातला आनंद घेता घेता आपल्यातील कलावंत जागृत ठेवून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने शिक्षकी पेशातील शिक्षक स्नेहसंमेलनात आपल्या कला सादर करत आहेत. ही गोष्ट फार कौतुकास्पद आहे. असे सांगत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या केंद्रावर प्रवेश घेतलेल्या शिक्षकांचे स्नेहसंमेलन घेण्याची चेअरमन उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱ्यांची कल्पना- उपक्रम फारच सुत्य असल्याचे सांगत आपणास या आनंद सोहळ्यात सहभागी करून घेतल्याबद्दल संयोजकांचे आभार मानले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे म्हणाल्या, आपल्या अनेक व्यवधानातून वेळ काढून आपणास ज्यातून आनंद मिळतो ते करत चला. स्वतःतील सुप्त कलावंताला ओळखा. त्याला उर्जितावस्थेमध्ये आणा. समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व्यवस्था निर्माण करणारे व्हा. विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देणारे त्यांच्यातील कला उर्जितावस्थेमध्ये आणणारे शिक्षक आपल्यातील सुप्त कलागुणांना स्नेहसंमेलनामध्ये सादर करत आहे. ते फार कौतुकास्पद आहे. असे सांगितले. चेअरमन उमेश गाळवणकरांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांचा नवीन नवीन शैक्षणिक कोर्स सुरू करण्याबद्दल चा सकारात्मक दृष्टिकोन पाहता भविष्यात कोणत्याही सहकार्याची गरज भासल्यास आपण ते द्यायला तयार असल्याचे सांगत वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उमेश गाळवणकर यांनी आपल्या मनोगतातून शुभेच्छा देताना विचारांचे डॉक्टर आणि उपचारांचे डॉक्टर यांच्या उपस्थितीत हे शिक्षकांचे स्नेहसंमेलन साजरे होत आहे. याबद्दल समाधान व्यक्त करीत मुक्त विद्यापीठाच्या कोणत्याही केंद्रावर अपवादाने साजरी केल्या जाणाऱ्या या स्नेहसंमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना. ‘जे करायचे राहून गेलेली आहे जे व्यक्त करायचे राहून गेलेले आहेत. त्यासाठीचे हे व्यासपीठ आहे. त्यातून नि:संकोचपणे व्यक्त व्हावे. अशा दृष्टिकोनातून या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले असल्याचे सांगत त्याला शिक्षकानी उत्तम प्रतिसाद दिला याबद्दल समाधान व्यक्त केले. हे संमेलन एन्जॉय करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ॲड. विवेक मांडकुलकर, डॉ. सतीश तेरसे, प्रा. नागेश कदम, प्रा. परेश धावडे, प्राध्यापिका रिद्धी पातडे, प्रा नितीन बांबर्डेकर यांनी मनोगतातून स्नेहसंमेलनात सहभागी सर्व शिक्षकाला शुभेच्छा दिल्या. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा नाईक यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्वरी राजाध्यक्ष, प्रणाली घाडी यांनी केले





