स्वतःमधील टॅलेंटचा शोध घेऊन ते जपा – पुष्कर श्रोत्री

अभिनेते पुष्कर श्रोत्री यांची बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला भेट

तुम्हाला घडविणाऱ्या गुरुजनांच्या प्रयत्नांना साथ द्या. तुमचे टॅलेंट जगाला दिसेल. त्यासाठी मराठी माणसाने आपल्या टॅलेंटचा शोध घेऊन त्याला जपले पाहिजे. ज्या मराठी माणसांनी आपले टॅलेंट सिद्ध केले त्याला मराठी माणसानेच साथ दिली पाहिजे. त्याचबरोबर संस्काराचे बाळकडू पाजणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करत तिचे भाषा वैभव जपले पाहिजे. तिचा दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे. तिच्यात लिहा. बोला. तिच्यामधून व्यक्त व्हा. त्यासाठी गुरुंची मदत घ्या. त्यांचा आदर करा. असे आवाहन प्रसिद्ध मराठी सिने अभिनेते, दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांनी केले. बॅ नाथ पै शिक्षण संस्थेला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत ते होते.
पुष्कर श्रोत्री त्यांच्या नवीन येऊ घातलेल्या मराठी सिनेमाच्या शूटिंग साठी जागा- लोकेशन बघण्यासाठी कुडाळ मध्ये आले असताना त्यांनी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेला भेट दिली. त्या सर्वांचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी स्वागत केले.त्यांच्यासोबत आर्ट डिरेक्टर सुमित पाटील, कॅमेरामन आशिष वैद्य, पटकथा लेखक चैतन्य राणे, असोसिएट डायरेक्टर विशाल पोळ ,प्रोडक्शन मॅनेजर सौरभ झुंजार, साईनाथ जळवी, निलेश सर्वेकर ,प्रमोद मस्के, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै महिला कॉलेजचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य वैशाली बांदेकर, पल्लवी कामत, प्रा. वैशाली ओटवणेकर इत्यादी उपस्थित होते.
मुलांना मार्गदर्शन करताना पुष्कर श्रोत्री म्हणाले, मराठी माणसाला मराठी अस्मितेला सात समुद्राकडे नेणाऱ्या मराठीला आपण टिकविले पाहिजे. त्यातील भाषा सौंदर्याचा व्यवहाराचा वापर केला पाहिजे. त्यासाठी वाचन करून स्वतःला घडवायला हवे. त्या मराठी भाषेतून आपण नवनवीन काहीतरी निर्माण करत रहा. जेणेकरून आपण काय करतो हे जगाला कळेल. असे सांगत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था पडद्यावर पाहिलेल्या लोकांना प्रत्यक्ष आपल्यासमोर घेऊन येते, हे तुमचे भाग्य समजा. त्याचा योग्य उपयोग करून घ्या आणि गुरुजनांच्या प्रयत्नाला तुमच्या प्रयत्नांची साथ द्या. मग तुम्ही घडाल आणि समाजही घडेल. मराठी सिनेमा आम्ही सिनेमा थिएटरमध्ये जाऊनच बघूया. असे आवाहन त्यांनी केले व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पुष्कर श्रोत्रींच्या शुभहस्ते कलाकार विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या छोटेखानी स्वागत समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंदार जोशी यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेतर्फे सर्व कलाकारांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!