“HELLO सिंधुदुर्ग”चे संपादक सागर चव्हाण यांना जिल्हास्तरीय “उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार” राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान

  • पत्रकार दिनाचं औचित्य

“HELLO सिंधुदुर्ग” डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पत्रकार दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवनात हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना जोशी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, सचिव बाळ खडपकर, परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, खजिनदार ॲड. संतोष सावंत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य तसेच जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सागर चव्हाण यांचा पत्रकारितेतील प्रवास हा शब्दांपेक्षा कृतीतून अधिक बोलणारा आहे. तरुण भारतच्या कॉलेज विश्वाच्या पुरवणीतून सुरू झालेला लेखणीचा प्रवास जिल्हा, राज्य आणि डिजिटल माध्यमांच्या विस्तीर्ण क्षितिजापर्यंत पोहोचला. ग्रामीण भागातील असहाय्य कुटुंबांचा आवाज बनणे, भूमिहीन शेतकऱ्यांसाठी न्यायाचा झेंडा उभारणे, पर्यावरणाच्या रक्षणासाठी निर्भीड लिखाण करणाऱ्या साऱ्या गोष्टी त्यांच्या पत्रकारितेची ओळख ठरल्या.

क्राईम रिपोर्टिंग करताना त्यांनी अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला, तर सामाजिक पत्रकारितेतून आंबेगाव सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या निकिता पाटीलसारख्या चिमुकल्याला जीवनदान मिळवून दिले. हे यश केवळ पत्रकाराचे नव्हते, तर माणुसकी जपणाऱ्या एका संवेदनशील मनाचे होते. सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या अन्यायाविरुद्ध उभे ठाकणारा हा पत्रकार कधीही सत्तेच्या छायेत रमला नाही, तर नेहमीच सामान्यांच्या बाजूने उभा राहिला.

डिजिटल माध्यमांचा नवा काळ सुरू होताच सागर चव्हाण यांनी कोकणात पहिल्यांदा डिजिटल पत्रकारितेचे बीज रोवले. सिंधुदुर्ग LIVE आणि पुढे कोकणसाद LIVEच्या माध्यमातून स्थानिक बातम्यांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिले. २४x७ स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीची संकल्पना साकार करत त्यांनी कोकणाच्या पत्रकारितेला नवा आत्मविश्वास दिला. आत्ताच नव्याने सुरु केलेल्या HELLO सिंधुदुर्ग या डिजिटल न्यूज चॅनेलमधून हा प्रवास अधिक व्यापक आणि प्रभावी झाला आहे.

पत्रकारितेपुरतेच नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची जिद्द त्यांच्या प्रत्येक उपक्रमातून दिसते. “सिटी ऑन सायकल”सारख्या पर्यावरणपूरक मोहिमा, मोतीबिंदूमुक्त सिंधुदुर्गसाठीचा आरोग्य उपक्रम, कोविड काळातील परप्रांतीय कामगारांसाठीची मायेची मदत, लोककलेच्या संवर्धनासाठी केलेले प्रयत्न हे सगळं त्यांच्या पत्रकारितेतील सामाजिक अधिष्ठान अधोरेखित करतं.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले सन्मान हे त्यांच्या कार्याची पावती आहेत. नेल्सन मंडेला ॲवॉर्डपासून दादासाहेब फाळके कोविड योद्धा पुरस्कारापर्यंतचा गौरव हा एका पत्रकाराच्या यशाचा आलेख नसून, समाजाशी नाळ घट्ट जोडलेल्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आहे.

आज सागर चव्हाण यांना सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळतो आहे, तो केवळ एका संपादकाचा नाही, तर सत्यासाठी झुंजणाऱ्या, माणुसकी जपणाऱ्या आणि पत्रकारितेला सामाजिक चळवळ बनवणाऱ्या एका निर्भीड पत्रकाराचा गौरव आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्काराने सागर चव्हाण यांच्या पत्रकारितेतील चारित्र्य, निर्भीडपणा आणि सामाजिक योगदानाचा यथोचित गौरव झाल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!