आचरा येथे पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त शस्त्रास्त्र प्रदर्शन

शस्त्रांचा उपयोग, सुरक्षेतील महत्त्व याची देण्यात आली माहिती

पोलिस रेझिंग डे सप्ताहानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलामार्फत फुरसाई मंदिराजवळील मैदानावर आयोजित करण्यात आलेला शस्त्रास्त्र प्रदर्शन व विविध जनजागृती उपक्रमांचा कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमात पोलिस दलाकडील विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक करून त्यांचा उपयोग, कार्यपद्धती व सुरक्षेतील महत्त्व याची माहिती सहभागी नागरिकांना देण्यात आली. तसेच पोलिस बँडच्या सुमधुर वादनाने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, जेष्ठ नागरिक संघांचे जेम्स फर्नांडिस, आचरा व्यापारी संघटना उपाध्यक्ष व पत्रकार परेश सावंत, मांगरीश सांबारी, कोरगावकर मॅडम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई, बबन पडवळ, मिलिंद परब, तसेच पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील, शिक्षकवर्ग, विध्यार्थी यांच्या उपस्थितीत झाली.
यावेळी महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियावरील गुन्हे, फसवे व्यवहार ओळखण्याच्या पद्धती, तसेच पोलिस दलाचे दैनंदिन कामकाज, जबाबदाऱ्या आणि नागरिकांचा सहभाग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रात्यक्षिके घेऊन कायद्याचे भान, जबाबदार नागरिकत्व आणि आपत्तीच्या प्रसंगी पोलिसांना कशी माहिती द्यावी याबद्दल समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, आचरा पंचक्रोशीतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, पोलिस पाटील तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती लाभली. उपस्थितांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सदर उपक्रमाचे आयोजन आचरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री. प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस कर्मचारी व स्थानिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!