जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती धोरणाची अंमलबजावणी करावी

नशाबंदी मंडळ, व्यसनमुक्ती सल्ला केंद्र गोपुरी आश्रमाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी २०११ च्या राज्य शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नशाबंदी मंडळ व व्यसनमुक्ती सल्ला केंद्र, गोपुरी आश्रम वागदे यांच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांना सादर केले.
या निवेदनाद्वारे प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यसनमुक्ती धोरण राबवून सध्या ऐरणीवर आलेल्या व्यसनाधीनतेला प्रतिबंध घालावा, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनासोबत व्यसनमुक्तीवरील महामानवांचे विचार असलेली पुस्तिकाही देण्यात आली. या पुस्तिकेमधील सावित्रीबाई फुले यांचे व्यसनमुक्तीविषयक विचार आजच्या समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे व मार्गदर्शक असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
नशाबंदी मंडळाकडून दरवर्षी १ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे, राजमाता जिजाऊ या पुरोगामी महान स्त्रियांच्या जयंतीनिमित्त स्त्रीमुक्ती पंधरवडा साजरा करण्यात येतो. स्त्री शिक्षणाचा पाया घालून समाजाला अधोगतीतून प्रगतीकडे नेणाऱ्या ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी व्यसनाधीनता ही समाजाच्या अधोगतीचे मूळ असल्याचे स्पष्ट करून व्यसनमुक्तीसाठी धाडसी प्रयत्न केले होते, याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
व्यसनाधीनतेमुळे मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना मानसिक, शारीरिक व सामाजिक त्रास सहन करावा लागतो. कौटुंबिक अत्याचार, हिंसाचार आणि असुरक्षितता यामध्ये वाढ होत असल्याने स्त्रीमुक्ती पंधरवड्याच्या निमित्ताने या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही सुचित करण्यात आले.
समाजातील, विशेषतः तरुणांमधील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी. ‘नशामुक्त भारत अभियान’ यासारखी अभियानं राबवताना सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे, राजमाता जिजाऊ यांसारख्या महामानवांचा आदर्श युवकांसमोर ठेवून धोरण अमलात आणावे, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.





