कासार्डे मधील युवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. अनंत नागवेकर डॉ. मयूर नागवेकर यांच्यावर गुन्हा दाखल

नागवेकर हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी जमावातील सुमारे 50 जणांवर देखील गुन्हा दाखल
अद्याप दोन्ही गुन्ह्यातील संशयीतांना अटक नाही
कासार्डे येथील युवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कणकवलीतील नागवेकर हॉस्पिटल चे डॉ. अनंत नागवेकर व डॉ. मयूर नागवेकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चंद्रकांत पाताडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता चे कलम 105 चे 3 (5) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, कासार्डे येथील युवती कस्तुरी चंद्रकांत पाताडे (वय 19) तिच्या मानेवर असलेली गाठ डॉ. अनंत नागवेकर व डॉ. मयूर नागवेकर यांनी कोणत्याही परिपूर्ण तपासणी न करता व शस्त्रक्रिया करताना काळजी न घेता तिचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना देखील तिचे चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केली. व तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल ची तोडफोड केल्याप्रकरणी तिथे जमलेल्या जमावावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी संशयितांची नावे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेली नाही.





