खारेपाटण हायस्कूलच्या मुलींचा ऐतिहासिक उंच भरारीचा प्रवास

लखनौ येथील स्काऊट गाईडच्या राष्टीय शिबिरासाठी विमानाने रवाना
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या ग्रामीण भागातील प्रशालेमध्ये शिकणाऱ्या स्काऊट गाईड विभागातील या विद्यार्थिनींनी नवे क्षितिज गाठत यंदाच्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक शिक्षकांसमवेत नुकत्याच लखनौ येथे विमानाने रवाना झाल्या आहेत. विशेष म्हणजे, या विद्यार्थिनी पहिल्यांदाच विमानप्रवासाचा थरार अनुभवणार आहेत. या ऐतिहासिक घटनेने संपूर्ण गावात आणि विद्यालयात मोठा उत्साह संचारला आहे. खारेपाटण प्रशालेच्या विद्यार्थिनी मुंबईहून थेट लखनौ येथे जाणाऱ्या विमानप्रवासात सहभागी झाल्या आहेत. हा विद्यालयाच्या इतिहासातील पहिलाच विमानप्रवास असल्याने हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरावा असा ठरला आहे. तर स्काऊट गाईड विभागाच्या प्रतिनिधीत्वात लखनऊ येथे होणाऱ्या शिबिरामध्ये प्रत्यक्ष सहभाग मिळवणं, हे गावासाठी गौरवाचे आणि विद्यार्थिनींसाठी नव्या स्वप्नांची द्वारे उघडणारे पाऊल ठरणार असल्याची प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक संजय सानप यांनी याप्रसंगी दिली आहे.
या ऐतिहासिक प्रवासासाठी विद्यार्थिनींसाठी विमान तिकीट, निवास, साहित्य, गणवेश अशा सर्व आवश्यक गोष्टींची व्यवस्था विद्यालयाच्या पुढाकाराने आणि एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मुलींना विमानप्रवासाचा अनुभव देण्याचे हे दुर्मिळ आणि प्रेरणादायी पाऊल आहे. अनेक विद्यार्थिनींसाठी हा आयुष्यातील पहिलाच विमानप्रवास, त्यामुळे त्यांच्या मनात उत्सुकतेला आणि आनंदाला उधाण आले आहे. हा उपक्रम केवळ भौतिक प्रवास न राहता विद्यार्थिनींच्या मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक वाढीसाठीही मोलाचा ठरणार आहे. त्यांच्या खांद्यावरील जबाबदाऱ्या हलक्या झाल्या असून त्या आता नव्या आत्मविश्वासाने आणि प्रेरणेने राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.ग्रामीण भागात राहूनही मोठी स्वप्ने बघता येतात आणि ती पूर्ण देखील करता येतात, हा सकारात्मक संदेश या मुलींनी दिला आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे गावातील आणि परिसरातील इतर मुलींसाठीसुद्धा प्रेरणादायी वातावरण निर्मिती झाली आहे. खारेपाटणच्या या विद्यार्थिनींचा उंच भरारीचा प्रवास केवळ लखनौपर्यंतच नव्हे, तर त्यांच्या उज्ज्वल भविष्याकडे विस्तृत पंख पसरवणारा झाला आहे. देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांसोबत राहण्याची, शिकण्याची, आणि अनुभवांची देवाण-घेवाण करण्याची एक अपुतपूर्व संधी या विद्यार्थिनींना या निमित्ताने मिळणार आहे.
तर या शिबिरासाठी प्रशालेमधील राहत फातिमा इरफान सारंग, तन्वी शक्तीकुमार उपाध्ये, ऋतुजा गोरक्षनाथ गायकवाड, सृष्टी गजानन कोलते, श्रावणी नवनाथ निमंगरे, श्रेया भालचंद्र गोरुले, राधा राजेंद्र ठाकूर-देसाई, सृष्टी वृषभ उपाध्ये या विद्यार्थिनी आणि सहाय्यक शिक्षिका म्हणून प्राजक्ता कोकाटे, शर्मिन काझी व रामदास भिसे यांचा यामध्ये सहभाग आहे. या शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थिनी व त्यांच्यासोबत सहभागी शिक्षक यांना खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक वर्ग यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.





