खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाविस्तार AI ॲप ची माहिती देणारी कार्यशाळा संपन्न

मंडळ कृषी अधिकारी तळेरे व तालुका कृषी अधिकारी कणकवली यांचेमार्फत महाविस्तार AI ॲप बाबत माहिती देणारी कार्यशाळा खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मधील रायबागकर सभागृहामध्ये नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी मंडळ कृषी अधिकारी तळेरे चे अधिकारी श्री. अर्जुन मधुकर जाधव व सहाय्यक कृषी अधिकारी चिंचवली श्री. सागर धोंडू चव्हाण हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप यांनी उपस्थित मंडळ अधिकारी व कृषी अधिकारी यांचे शाळेच्या वतीने स्वागत केले. तर या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी डिजिटल मदतनीस म्हणून महाविस्तार AI लॉन्च करण्यात आलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, नवनवीन शेती तंत्रज्ञान, शेतमालाचे बाजार भाव, शेतकऱ्यांच्या शेती संदर्भातील प्रश्नांना तात्काळ उत्तरे, माती परीक्षण आदी कामे घरबसल्या करता येतील अशी माहिती कार्यक्रमासाठी उपस्थित मंडळ कृषी अधिकारी तळेरे श्री. अर्जुन मधुकर जाधव यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईलवर हे ॲप उपलब्ध करून त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या ॲपचा ग्रामीण भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ करून घ्यावा असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. तसेच शासनाच्या या डिजिटल उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना करून दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने प्राचार्य श्री. संजय सानप यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.





