सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचा काव्य पुरस्कार कवयित्री डॉ. योगिता राजकर यांना जाहीर

डिसेंबर मध्ये सम्यक संबोधी साहित्य संमेलनात पुरस्काराचे वितरण

  सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेचा 2025 सालचा काव्य पुरस्कार वाई येथील कवयित्री डॉ. योगिता राजकर यांच्या सृजन प्रकाशन मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या 'बाईपण' या दीर्घ कवितेच्या संग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. संस्थेच्या इथे झालेल्या बैठकीत सदर पुरस्कारासाठी डॉ. राजकर यांच्या 'बाईपण' या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांनी दिली.
   सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेची बैठक यावर्षी होणाऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कणकवली येथे आयोजित करण्यात आली.संस्थेचे सचिव सूर्यकांत साळुंखे, उपाध्यक्ष संदीप हरी कदम, खजिनदार नेहा कदम, संतोष कदम, धम्मपाल बाविस्कर, सत्यवान साटम, रीना पाटील, शशिकांत तांबे आदी उपस्थित असणाऱ्या बैठकीत दोन हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाचा सदर पुरस्कार 'बाईपण' या काव्यसंग्रहाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संस्थेच्या आगामी संमेलना संदर्भातही चर्चा करण्यात आली.
   कवयित्री डॉ. योगिता राजकार या नव्या पिढीतील एक प्रसिद्ध कवयित्री असून मुंबई सृजन प्रकाशनातर्फे त्यांचा बाईपण' हा दीर्घ कवितेचा संग्रह प्रकाशित झाला आहे. बाईच्या शोषित जगण्याचा तळ खोदून काढताना बाईच्या अस्तित्वाचा धांडोळा घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न 'बाईपण' या कवितेत करण्यात आला आहे. अतिशय सूक्ष्म पातळीवर बाईच्या दिनक्रमाची गाथा मांडता मांडता बाईच्या वेदनेचा पट उलगडत जाणारी ही कविता अपवादात्मक मराठीत लिहिल्या जाणाऱ्या कवयित्रींच्या दीर्घ कवितेत स्वतःच स्थान अधिक ठळक करत जाते. या सगळ्याचा विचार करून बाईपण या काव्यसंग्रहाची सम्यक संबोधी काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती किशोर कदम यांनी दिली.
error: Content is protected !!