वर्षानुवर्षे भूखंड अडविणाऱ्याना कारणे दाखवा नोटिस द्या – मंत्री उदय सामंत

कुडाळ एमआयडीसी असोसिएशनच्या वतीने उद्योग मंत्र्यांचा सत्कार
आडाळी एमआयडीसीमध्ये ३४ हेक्टर गायब
: कुडाळ एमआयडीसी मधील ज्यांचे भूखंड वर्षानुवर्षे पडून आहेत तिथे कोणताही उद्योग उभारला नाही त्या भूखंड धारकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. वर्षानुवर्षे भूखंड पडीक ठेवून त्यावर उद्योग का उभारला नाही याबद्दलचे खुलासे मागवून घ्या आणि ज्यांचे खुलासे योग्य नसतील त्यांच्या कडून ते भूखंड काढून घ्या असे देखील आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. कुडाळ एमआयडीसी इंडस्टीज असोसिएशनच्या वतीने येथील बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज सत्कार करण्यात आला. त्यांनतर सत्काराला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. त्याच बरोबर आडाळी एमआयडीसी मधील ३४ हेक्टर जमीन अजूनही एमआयडीसीच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे त्या जमिनीचा शोध लावला जाईल आणि उद्योजकांना भूखंड वितरित केले जातील असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कुडाळ एमआयडीसी साठी ३७ कोटींचा निधी दिला. त्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य गेल्या तीन वर्षाच्या काळात लाभले. त्याबद्दल कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या वतीने नामदार उदय सामंत यांचा आज सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रख्यात उद्योजक बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, राजन तेली, कुडाळ एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सचिव ऍड. नकुल पार्सेकर, आनंद बांदिवडेकर, अमित वळंजू, उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रख्यात उद्योजक बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड आणि आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते मंत्री उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.ऍड. नकुल पार्सेकर यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी प्रास्ताविकातून असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी मंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीयामध्ये केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. मंत्री उदय सामंत यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून हा सत्कार सोहळा असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात कुडाळ एमआयडीसी मध्ये दरवषी २५ उद्योग बंद होत होते. पण गेल्या तीन वर्षात कुडाळ एमआयसीडी मध्ये ७० नवीन उद्योग आल्याचे मोहन होडावडेकर यांनी सांगितले. कुडाळ एमआयडीसी मध्ये क्रीडा संकुल होण्याची मागणी त्यांनी अधोरेखित केलीच, पण वर्षानुवर्षे पडून असलेल्या भूखंडावर अजून उद्योग उभारले गेलेले नाहीत हि बाब देखील मंत्री उदय सामंत यांच्या निदर्शनाला आणून दिली.
कुडाळ एमआयडीसी अशोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांच्या भाषणाचा हाच धागा पकडून मंत्री उदय सामंत यांनी, ज्यांनी वर्षानुवर्षे उद्योग न उभारता भूखंड अडवून ठेवले आहेत, त्यांच्याकडून ४८ तासात खुलासे घेण्याचे आणि योग्य खुलासा न आल्यास त्यांच्या कडून भूखंड काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. आडाळी एमआयडीसी बाबत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले कि, या एमआयडीसी क्षेत्रातील ३४ हेक्टर जमीन अद्याप एमआयडीसीला प्राप्त झालेली नाही. ती कुठे गायब झाली आहे याचा शोध घेतला जाईल. यात ज्या उद्योजकांनी भूखंड खरेदी केली आहे, त्यांना तेवढा वाढीव कालावधी एमआयडिसीकडून वाढवून दिला जाईल असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी मध्ये क्रीडा मैदानाची जागा आरक्षित आहे. त्यासाठी कागदपत्र देखील तयार झाली आहेत. आमदार निलेश राणे यांनी ते मैदान लवकरात लवकर व्हावे अशी आपल्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे पुढील आचारसंहितेनंतर त्यावर काम होईल आणि कुडाळ एमआयडीसी मध्ये मैदान उभे राहील असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जो बांबू फक्त आड्याला आणि मढ्याला वापरला जायचा त्या बांबूवर सिंधुदुर्गातील संजीव कर्पे यांनी प्रक्रिया करून बांबू उद्योगाला उर्जितावस्था आणली. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाला बांबू धोरण राबवावे लागले. हा सिंधुदुर्गचा विजय आहे, असे कौतुकोद्गार मंत्री उदय सामंत यांनी काढले. गेल्या तीन वर्षात कुडाळ एमआयडीसीमध्ये ७० उद्योग आले हि सकारत्मक गोष्ट असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले. दरम्यान महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्सने आपसातले वाद मिटवावेत असा सल्ला देखील यांनी उपस्थित अध्यक्षांना दिला. हा सत्कार माझा एकट्याचा सत्कार नाही. तर तो एमआयडीसीसाठी काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार आहे. प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी हा लोकांना आणि उद्योजकांना बांधील असतो असेही मंत्री सामंत म्हणाले. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनायक सुझुकीचे राजेंद्र तेरसे आणि ऍक्युरेट इंजिनियरिंगचे कौसर खान यांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श गुणवंत कामगार साईशक्ती ऑटोचे दीपक लिंगे, सुमो कंटेनर्सचे शिवाजी लाड, प्रकाश पिळणकर, नेक्स्ट ड्राइव्ह टीव्हीएसचे अमोल कुडपकर, महाराष्ट्र इंजीनियरिंगचे दत्तराज केरकर, लक्ष्मण करगुटकर, मयूर अँग्रोचे बाळा कुंभार, अमृता काजूचे सुनील परुळेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत एमडयसीसी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी सुनील सौदागर, ऍड. अजित भणगे, एम के गावडे, आनंद बांदिवडेकर, शशिकांत चव्हाण, प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, रोटरी अध्यक्ष राजीव पवार, उद्योजक सुभाष मयेकर असे अनेक उद्योजक, पदाधिकारी, बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे शिक्षक, प्राध्यापक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभारप्रदर्शन ऍड. नकुल पार्सेकर यांनी केले.





