सूत्रधाराला अटक करून मारहाण झालेल्या कुटुंबाला न्याय द्या !

मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी पोलिसांकडे मागणी
मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली पिंगुळीतील चव्हाण कुटुंबियाची भेट
पिंगुळी येथील विजय चव्हाण आणि कुटुंबियांना मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हा प्रमुख धीरज परब यांनी त्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच या प्रकरणी कुडाळचे पोलीस निरिक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सूत्रधाराला अटक करा, त्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०९ नुसार कारवाई करा आणि चव्हाण कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. तसे झाले नाही तर मात्र सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था आणि नागरिक यांना घेऊन कुडाळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा धीरज परब यांनी दिला आहे.
जमीन जागेच्या वादावरुन बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गानजीक पिंगुळी-धुरीटेंबनगर येथे विजय कोंडीबा चव्हाण यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेमध्ये त्या कुटुंबातील चौघेजण जखमी झाले असून पती-पत्नी व त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. संशयितांनी सफारी कार व टाटा कंपनीचे टोचन वाहनावर मोठे दगड मारुन नुकसान केले. याबाबतची फिर्याद विजय कोंडीबा चव्हाण (रा. पिंगुळी-धुरीटेंबनगर) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. या मारहाणप्रकरणी अक्षयं जडये (रा. अणाव, पूर्ण नाव माहीत नाही) याच्यासह एकूण आठ जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जमीन जागेच्या वादावरुन अक्षय जडये याच्या सांगण्यावरुन त्याचे गडग्याचे काम करणारा गवंडी कामगार, त्याच्यासोबतचा एक काळासा दाढी असलेला गोल चेहरा असलेली व्यक्ती व आणखी अनोळखी काहीजणांनी लाकडी दांडे व लोखंडी रॉडने आपल्याला मारहाण करुन दुखापत केली, अशी फिर्याद विजय चव्हाण यांनी दिली आहे.
दरम्यान याबाबत मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे, विजय जांभळे, प्रथमेश धुरी, यतीन माजगावकर, चेतन राऊळ यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. गाड्यांची तोडफोड केली होती त्याची पाहणी केली. चव्हाण कुटुंबियांनी त्यांना घटनेची माहिती दिली.
मुलीचे पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे ?
या मारहाणीत विजय चव्हाण यांची मुलगी जखमी झाली आहेत. हल्लेखोरांनी त्या मुलीला सुद्धा मारहाण केली. त्यात तिचा हात डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. तिच्या भावाने बहिणीसाठी शाळा सोडली आणि तिला शिक्षण दिले. त्याही परिस्थितीत ती मुलगी पोलीस भरतीसाठी मेहनत घेत होती. पण या मारहाणीत तिचा हात मोडला आणि तिचे पोलीस भरतीचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. मला न्याय मिळेल का असा सवाल तिने केला आहे. या प्रकरणी विजय चव्हाण यांच्या पत्नीला देखील डोक्यावर लोखंडी रॉड ने मारहाण करण्यात आली आहे. त्यात त्या जखमी झाल्या आहेत. विजय चव्हाण आणि त्यांचा मुलगा याना देखील मारहाण झाली आहे.
मनसेचे धीरज परब यांनी त्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा धीर दिला. त्यांनतर त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली. त्यांना हा घटनाक्रम सांगून जमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सांगितले. जिल्ह्यातील मोठा भूमाफिया या घटनेचा सूत्रधार असून अशा प्रकारचे जीवघेणे हल्ले त्याची माणसे करत आहेत. त्यामुळे त्या सूत्रधारावर भारतीय न्याय संहिता कलम १०९ नुसार कारवाई करावी आणि त्या चव्हाण कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी धीरज परब यांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर मात्र सर्वपक्षीय, सर्व सामाजिक संस्था आणि नागरिक यांना घेऊन कुडाळ पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा धीरज परब यांनी दिला आहे.





