कणकवली शहराच्या राजकारणात लवकरच मोठी घडामोड घडणार?

भाजपाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पुन्हा कणकवलीत शहर विकास आघाडीचे वारे

संभाव्य शहर विकास आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये संपर्कांचा धडाका

नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या बैठकीनंतर भाजपाच्या नेत्यांकडून स्वबळाचे संकेत देण्यात आल्यानंतर कणकवली नगरपंचायत निवडणुकी करिता घडामोडींनी पुन्हा वेग घेतला आहे. भाजपाच्या या स्वबळाच्या घोषणेनंतर पुन्हा एकदा कणकवली शहरात शहर विकास आघाडीचे वारे जोर धरू लागले आहेत. यात भाजपा पक्षप्रवेशासंदर्भात तसेच नगराध्यक्ष पदाकरिताची बोलणी फिस्कटल्याने आता पुन्हा कणकवली शहर विकास आघाडी मध्ये संभाव्य होऊ घातलेली बहुधा राज्यातील पहिली युती होण्याच्या दृष्टीने पुन्हा पावले पडू लागली आहेत. सध्या पुन्हा सुरू झालेली ही बोलणी जर यशस्वी झाली तर लवकरच कणकवली शहराच्या राजकीय घडामोडींना वेग येत मोठा पक्षप्रवेश देखील होण्याची शक्यता आहे. शहर विकास आघाडी मधील एकत्र येऊ घातलेले दोन्ही पक्ष हे या अनुषंगाने हालचाली करत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे “तगड्या” नेत्याकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची धुरा सोपवत स्वबळाचा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सामना केला जाण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात व्हायला अजून चार दिवस शिल्लक असताना त्या अगोदर कणकवली शहराच्या राजकारणात पडद्यामागे वेगवान घडामोडी घडत आहेत. शहर विकास आघाडी मधील संभाव्य दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये सातत्याने संपर्क सुरू असून ही बोलणी आता यशस्वी होणार की पुन्हा चर्चा फिस्कटणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!