संस्थान आचरा गावच्या कार्तिकोत्सवाची सांगता

संस्थान आचरे गावच्या गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवातील पालखी सोहळ्याची सांगता बुधवारी रात्रौ दिपोत्सवाने तर पहाटे सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता गुरुवारी पहाटे दहिहंडी फोडून करण्यात आली.
संस्थान आचरेगावचा सर्वात मोठा म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर हा उत्सव सुरू असतो. यात रात्रौ पालखी सोहळा असतो तर पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती रंगते. पहाटे साडेचार पासूनच विठ्ठल नामाचा जयघोष सुरु होतो. अभंग, गजर, भक्तीगीते गाईली जातात. विठ्ठल रखुमाई, शिवराम महाराज पादुकांचे ब्राह्मण सचिन केळकर यांच्या हस्ते विधिवत स्नान पुजन, नैवेद्य आदी विधी होतात. काकडा ओवाळला जातो. रामेश्वर आरतीसह विठ्ठलाच्या आरती घेऊन भक्तजन रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा घालतात. असा काकड आरतीचा महिनाभर थाट होता. कोजागिरी पौर्णिमेपासून रोज रात्री पालखी परीक्रमा होते.
कार्तिक दशमीला आचरा वरचीवाडी येथील नारायण मंदिराला तर कार्तिक एकादशीला देवूळवाडी येथील विठ्ठल मंदिराला श्री विष्णू विराजीत पालखी भेट देते.
त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी रामेश्वर मंदिर आणि दिपमाळा आकर्षक फुलांनी सजविण्यात येवून दिपोत्सव करण्यात आला होता. काही ठराविक वेळीच होणारे पंचमुखी महादेवाचे दर्शन त्रिपुरारी पूर्णिमेदिवशी होत असल्याने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पहाटे विठ्ठल मंदिरातील काकड आरतीला प्रदक्षिणेनंतर पावल्यांचा फेर धरून दहिहंडी फोडून या सोहळ्याची सांगता करण्यात आली.





