उद्यापासून कुडाळ मध्ये ‘कुडाळदेशकारां’चा १० वा क्रीडामहोत्सव

सकाळच्या सत्रात क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन खास आकर्षण
अध्यक्ष रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती
गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्था यांच्या वतीने दि. ७, ८ आणि ९ नोव्हेंबरला कुडाळमध्ये १०वा क्रीडा महोत्सव अर्थात KPL २०२५ चे आयोजन करण्यात आलं आहे. याची सुरुवात ७ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता कुडाळ हायस्कुलच्या मैदानावर क्रीडा स्पर्धने होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमात विविध राज्यातून सुमारे ४ ते ५ हजार कुडाळ देशकर बांधव सहभागी होणार आहेत. क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलादालन अशा कार्यक्रमांची रेलचेल यंदाही असेल अशी माहिती कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे अध्यक्ष रणजित देसाई आणि केपीएलचे क्रीडा संघटक मनीष दाभोलकर यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
केपीएल २०२५ बाबत रणजित देसाई आणि मनीष दाभोलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी रणजित देसाई, मनीष दाभोलकर यांच्यासह प्रशांत धोंड, प्रफुल्ल वालावलकर, अतुल सामंत, केदार सामंत, रोहन देसाई, मनोज वालावलकर, अभय सामंत, गुरु देसाई, सचिन देसाई, तृप्ती प्रभुदेसाई, विपुल प्रभू, श्रीकृष्ण सामंत, साहिल देसाई, सागर नाईक, मनोज तेंडुलकर, विकास वाघ, रवींद्र प्रभू उपस्थित होते. यावेळी टीशर्ट आणि पाण्याच्या बॉटल यांचे अनावरण करण्यात आलं.
रणजित देसाई म्हणाले, राष्ट्रीय युवा दिन १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून तरुण पिढीसाठी क्रीडा महोत्सव (KPL) ची सुरुवात २०१६ साली गोरेगाव येथून झाली त्यानंतर पनवेल २०१७, कुडाळ २०१८, गोवा २०१९, डोंबिवली २०२०, कुडाळ २०२१ दापोली रत्नागिरी २०२२, मंगलोर २०२३, पुणे २०२४ व आता १०वा क्रीडा महोत्सव कुडाळ हायस्कूल व बॅ. नाथ पै कॉलेज, कुडाळ येथे ७, ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे. त्यात मंगलोर, गोवा, विरार, पुणे, सिंधुदुर्ग, पनवेल, मुंबई, डोंबिवली, कोल्हापूर, बेळगाव हून ३४ पुरुष क्रिकेट संघ व १२ महिला क्रिकेट संघ सामील होत आहेत. तसेच २५० कॅरम, १५० बॅडमिंटन, १६० बुद्धिबळ, तसेच कलादालन रांगोळी व निबंध स्पर्धेकरिता अनेक खेळाडूंनी भारतातून सहभाग नोंदवला आहे.
कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग संस्था यांनी १०वा क्रीडा महोत्सव KPI. २०२५ कुडाळमध्ये आयोजन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग स्थापन झाल्यापासून विविध समाजोपयोगी उपक्रम उदा वधूवर संमेलन, कला, गायन व नृत्य, मालवणी नाटक, दशावतार, विद्यार्थी कौतुक सोहळा इत्यादि तसेच अनेक प्रकारे गरजूंना मदत करीत आहे. कला क्रीडा कौशल्य विकास व्हावा इंटरनेट, समाज माध्यम काल्पनिक विश्वातून लहान मुलांनी बाहेर पडून माती मैदानाशी नाळ जोडावी. तसेच हा क्रीडा महोत्सव फक्त तरुणांचाच नसून यामध्ये संपूर्ण कुटुंबच भाग घेते. आजी-आजोबा, सासू-सुना, नातू-नातवंडे, आई-बाबा सर्व भारतातील ज्ञातीबांधव एकत्र येऊन सहभागी होतात. हे या क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ठ आहे. मुंबई, पुणे, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, बेळगाव, गोवा, मणिपाल, बंगलोर, मंगलोर, उडुपी येथील युवा पिढीने मोठ्या प्रमाणात विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
कुडाळदेशकर प्रीमियर लीग (KPL) २०२५ मध्ये १०व्या वर्षी १० खेळ त्यात मुख्यत्वे क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, रांगोळी, बुद्धिबळ, निबंध स्पर्धा, धावणे, चमचा लिंबू, बेडूक उड्या व फॅन्सि ड्रेस खेळविले जातील व यंदा प्रथमच कुडाळ येथे कलादालन प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ चित्रकार श्री. अरुण दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री B. G. सामंत सर उपस्थित राहून कलादालनाची आखणी करणार आहेत. ज्यात चित्रकला, शिल्पकला व हस्तकला सादर केली जाईल. शिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम व्यावसायिक व स्थानिक कलाकारांकडून ७ व ८ नोव्हेंबर रोजी सायं. ठीक ७:०० वा. “पु. ल. देशपांडे रंगमंच्य, बॅ. नाथ पै. संकुल” येथे सबकुछ कुडाळदेशकर असा सांस्कृतिक कार्यक्रम व दशावतार कार्यक्रम सादर केले जातील, त्यानंतर प्रीती भोजन होईल.
श्री देसाई पुढे म्हणाले, १० व्या क्रीडा महोत्सवाचे प्रमुख पाहुणे उदय सामंत साहेब (उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य),रणजीत देसाई, जगदीश वालावलकर, मनीष दाभोलकर, महेश ठाकुर, अध्यक्ष कर्नाटक संस्था व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ७.३० वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल त्यात मशाल, शपथविधी, सत्कार, शुभेच्छा पर भाषण त्यानंतर क्रिकेट व इतर खेळांचे सामने सुरु होतील तर रविवार ९ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना ठीक दुपारी २:३० वाजता व नंतर बक्षीस समारंभ सुरू होईल. या दोन्ही कार्यक्रमास समाजातील प्रतिष्ठित मान्यवर, क्रीडा जगतातील खेळाडू, उद्योजक व पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
मनीष दाभोलकर म्हणाले, समाज ऐक्याची नवीन व अभिनव दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी गौड़ ब्राह्मण सभा ही समाजसेवी ज्ञातीसंस्था १८९७ साली गिरगावात १२८ वर्षा पूर्वी स्थापन झाली. पूर्वजांचे विचार व संस्कार नव्या पिढीपर्यंत डोळसपणे पोहोचवणे त्यांना एकत्र आणणे, बंधुता, एकता व विश्वास निर्माण करणे, वधू-वर सभा संमेलने, इत्यादी मेळावे भरवून अंगीभूत कलागुणांना वाव देणे. कलाकारांचा, विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा उचित आदर सन्मान करणे, गरीब, गरजू, होतकरू, मुला-मुलींना शिष्यवृत्ती देणे, पारितोषिके देऊन गौरविणे निराधार, निराश्रित महिला-पुरुष, कर्करोग, हृदयविकार, मतिमंद आदि व्याधिग्रस्त यांना वैद्यकीय सहाष्प, कन्यादान निधी वाटप व ‘गौड ब्राह्मण त्रैमासिक प्रकाशित करणे जे गेली ८७ वर्षे अविरत सुरू आहे.





