खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी प्रवीण लोकरे यांची निवड
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शैक्षणिक संस्थेची संचालक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून पुन्हा एकदा या संस्थेच्या अध्यक्षपदी संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. प्रवीण दिगंबर लोकरे यांची सलग चौथ्यांदा सर्वानुमते फेर निवड करण्यात आली आहे. तर नवनिर्वाचित संचालक मंडळ कार्यकारणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटणच्या कै. चंद्रकांत पारीसा रायबागकर सभागृहात संस्थेचे माजी अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंगळावर दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाली. या जनरल सभेत सन २०२५ – २६ ते सन – २०२९ – ३० या पुढील ५ वर्षाच्या कालावधी करिता संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पाडली. संस्थेच्या माजी संचालक कार्यकारणी मंडळाला सभागृहाने पुन्हा एकदा मान्यता देऊन ही निवडणूक बिनविरोध पार पाडली. यावेळी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे व संचालक मंडळाने सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानून सभासदाने आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावून संस्थेचे कामकाज पारदर्शक करण्या बरोबरच संस्थेला शिक्षण प्रक्रियेत प्रगती पथावर नेणार असल्याचे यावेळी सांगितले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची पुढील ५ वर्षासाठी निवडण्यात आलेले कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे – श्री प्रवीण दिगंबर लोकरे,श्री रघुनाथ माधव राणे, श्री. महेश मधुकर कोळसुलकर, श्री. राजेंद्र जयप्रकाश वरूणकर, श्री. संदेश पुरुषोत्तम धुमाळे, श्री. विजय जयराम देसाई, श्री. मोहन भास्कर कावळे, श्री. भिकाजी केशव कर्ले, श्री. आत्माराम देवू कांबळे, श्री. प्रशांत धनाजी गुळेकर, श्री. दिगंबर अनंत राऊत, श्री. गुरुप्रसाद दीपक शिंदे, श्री. योगेश सुरेश गोडवे या सर्व नूतन संचालक मंडळाचे खारेपाटण हायस्कुल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय सानप व पर्यवेशक श्री. संतोष राऊत तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर झुंझार मित्र मंडळ खारेपाटण चे अध्यक्ष श्री. संकेत शेट्ये व रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री. दयानंद कोकाटे यांनी देखील सर्व रोट्रियन यांच्या वतीने नूतन संचालक मंडळ सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या.





