कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाकडून समीर नलावडे यांचे नाव आघाडीवर

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता

ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या संभाव्य भाजपा, शिंदे शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांना जोर

भाजपच्या आजच्या बैठकीमध्ये काय घडते? त्याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष

कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर गेले काही दिवस कणकवली शहरात राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. भाजपा कडून कणकवली नगरपंचायत च्या नगराध्यक्ष पदासाठी अद्याप उमेदवाराचे नाव जाहीर झालेले नसले तरी सद्यस्थितीत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाव भाजपा कडून आघाडीवर आहे. नुकतीच या अनुषंगाने कणकवलीतील भाजपाच्या काही प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये भाजपाच्या निष्ठावान व प्रामाणिक इच्छुक उमेदवारांना उमेदवारी देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. तसेच आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे ही मागणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यातच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या संभाव्य भाजपा व शिंदे शिवसेनेच्या पक्ष प्रवेशाबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र श्री. पारकर यांच्याकडून याबाबत अद्याप कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. परंतु रवींद्र चव्हाण यांचा आज असलेला प्रदेशाध्यक्ष निवडीनंतरचा पहिला सिंधुदुर्ग दौरा पाहता या दौऱ्या दरम्यान काही मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती होणार की भाजपा स्वबळावर लढणार याबाबत दिले काही दिवस उलट सुलट चर्चा असताना भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून स्वबळाचा नारा देण्यात आला होता. पालकमंत्री नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे दोन्ही प्रमुख नेते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वबळासाठी आग्रही असल्याचे समजते. त्यामुळे याबाबतही आज या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राजकीय केंद्र असताना कणकवली नगरपंचायत च्या राजकारणात माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हे या घडामोडीं दरम्यान केंद्रस्थानी राहिले आहेत. श्री नलावडे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी आघाडीवर असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सिंधुदुर्गातील इतर काही उमेदवारांवर आज रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीदरम्यान शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच या निवडणुकीदरम्यान भाजपामध्ये येणाऱ्या काही अन्य पक्षातील नेत्यांना पाच /आठ नगरसेवक पदाच्या उमेदवारी चे आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळा सुरू आहे. मात्र हे आश्वासन प्रत्यक्षात कशाप्रकारे येणार? की नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले “ते” नेते अन्य मार्ग पत्करणार? त्याची उत्सुकता आता लागून राहिली आहे. गेले काही वर्ष नगरपंचायत ची नगरसेवक नगराध्यक्ष पदांची मुदत संपल्यानंतर शहर भाजपाचे कार्यालय सुरू करत समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने नगरपंचायत च्या राजकारणाच्या प्रवाहामध्ये राहत शहर भाजपाच्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संपर्क ठेवला होता. त्यामुळे सध्या स्थितीत श्री. नलावडे यांचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी साठीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा संभाव्य भाजपा प्रवेश हा कधी होणार आहे? की हा प्रवेश रखडणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यातच शिंदे शिवसेनेकडून देखील ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना पक्षप्रवेशाची ऑफर असल्याची चर्चा कणकवलीच्या राजकारणात सुरू आहे. त्यांच्याकडून श्री. पारकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याची ऑफर दिल्याची चर्चा कणकवली शहराच्या राजकारणात सुरू आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी कणकवली शहर विकास आघाडी हा पर्याय समोर आल्याने ही आघाडी अस्तित्वात येणार का? शिंदे शिवसेना व ठाकरे शिवसेना या आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार का? की हे तिन्ही पक्ष स्वतंत्र लढणार? की भाजपा व शिंदे शिवसेनेची महायुती होणार? ते देखील आजच्या भाजपाच्या बैठकीनंतर पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्या आज घेतल्या जाणाऱ्या भूमिकेकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

error: Content is protected !!