कुडाळ पं स मध्ये’पोषणाचा नवोत्सव’ कार्यक्रम

जिल्ह्यात आठव्या राष्ट्रीय पोषण महाअभियानाची सुरुवात

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग च्या वतीने आठवे राष्ट्रीय पोषण महाअभियान दिनांक १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सदर महाअभियानाच्या अनुषंगाने पंचायत समिती कुडाळ व एकात्मिक बालविकास सेवा योजना कुडाळ यांच्या वतीने तालुकास्तरावर पोषणाचा नवोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २२ ते दिनांक २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत पंचायत समिती कुडाळच्या अल्पबचत सभागृहात करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच झाले.
     २२ रोजी नवोत्सव कार्यक्रमातंर्गत पोषण गॅलरीचे उदघाटन गटविकास अधिकारी प्रफुल्ल भास्कर वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ए .बा. वि. से. यो कुडाळच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम. छाया घाडीगांवकर, अधिक्षक मृणाल कार्लेकर, अभय केंद्र कुडाळचे संरक्षण अधिकारी मिलन कांबळे, सहाय्यक लेखाधिकारी राजु खेत्री, सहाय्यक संरक्षण अधिकारी अक्षय कानविंदे, समुपदेशक महेंद्र जाधव, समुपदेशक सुनिल प्रभू ( स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभाग-पंचायत समिती कुडाळ), प्रकाश तेंडोलकर (आरोग्य सेवक, उपकेंद्र घावनळे), पर्यवेक्षिका ललिता कासले, शर्मिला वळवी, मंगला सुतार, राखी राणे तसेच पंचायत समिती कुडाळ मधील कर्मचारी वृंद उपस्थित होते.
         पोषण गॅलरी उपक्रमामध्ये स्थानिक पोषण पाककृती व स्थानिक भाज्या, फळे यांचे माहितीपट,  धान्य-कडधान्य यांच्यापासून बनवलेले दागिने,पोषण संदेश कार्ड, पोषणविषयक संदेश देणा-या कलाकृती, यम्मी यम्मी खाऊ कोपरा, पोषण सेल्फी झाड, पोषण अन्नपूर्णा देवी, रंगांचे पोषणमुल्य माहितीपट इ. गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे.
         या उपक्रम कालावधीत नवोत्सव कार्यक्रमांतर्गत बाबा पालकांचा पोषण आणि बालसंगोपनात सहभाग वाढविण्यासाठी बाबा पालकांना पोषण आहार , आरोग्य, बालसंगोपन कार्यशाळा तसेच पोषणविषयक पाककृती प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तसेच सदर कालावधीत बालकांचा आहार, आरोग्य व संगोपन याविषयी प्रकाश तेंडोलकर, आरोग्य सेवक, उपकेंद्र घावनळे हे मार्गदर्शन करणार आहेत.
       दिनांक २३ रोजी बाबा पालकांसाठी बालसंगोपन कार्यशाळा घेण्यात आली. त्यानंतर श्री. समिर वेंगुर्लेकर, कनिष्ठ सहाय्यक, एकात्मिक बालविकास प्रकल्प कुडाळ यांनी पोषणविषयक जनजागृतीपर कवितेचे सादरीकरण केले. त्यानंतर हिर्लोक बीटच्या बुवा श्रीम. तवटे आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पोषणविषयक भजन सादर केले.  बाबा पालकांसाठी पोषणविषयक खेळ घेण्यात आले.
      दिनांक २४ रोजी मेंदुचे जाळे व कसाल बीटने सादर केलेले टिप-या व फुगडीचा कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक २५ रोजी पाळणा, बाळाचे बारसे सोहळा, उखाणे, कविता, चारोळया इ. कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक २६ रोजी सकाळी श्री. प्रभु, स्वच्छता कक्ष पंचायत समिती कुडाळ यांचा पोषणावर आधारीत सुश्राव्य किर्तन कार्यक्रम झाला. सदरचा कार्यक्रम हा दि. २९ पर्यंत असणार आहे. यापुढील कालावधीत  टिप-या, गोफ, दहीहंडी आणि दशावतार- कोकणची लोककला इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

error: Content is protected !!