‘कुडाळेश्वर’ ची २२ पासून सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धा

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने बक्षीस रकमेत भरघोस वाढ

दोन टप्प्यात होणार स्पर्धा

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे श्री देव कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. ऍड. अभय देसाई स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रामध्ये दि. २२ सप्टेंबर पासून हि स्पर्धा सुरु होणार असून, यंदा या स्पर्धेचे ५० वे वर्ष असल्याने या सुवर्णमहोत्सवी भजन स्पर्धेच्या निमित्ताने बक्षिसाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. विजेत्या भजन मंडळाला यंदा ५० हजार रुपयांचे भरघोस पारितोषिक मिळणार आहे, अशी माहिती श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, हि सुवर्ण महोत्सवी कै. अॅड. अभय देसाई स्मृति सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा नवरात्र उत्सवामध्ये आयोजित केली आहे. सन २०२५ मध्ये या भजन स्पर्धेचे ५० वे वर्ष असल्याने भव्य अशी भजन स्पर्धा आयोजित करीत असल्याने भजन स्पर्धेकरीता बक्षीसेही भरघोस ठेवण्यात आली आहेत. प्रथम क्रमांक रु. ५०,०००/-, व्दितीय क्रमांक रु. ३०,०००/-, तृतीय क्रमांक रु. २०,०००/-, चतुर्थ क्रमांक रु, १०,०००/-, पाचवा क्रमांक रु. ५०००/-, याशिवाय उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट पखवाजवादक, उत्कृष्ट हार्मोनियमवादक, उत्कृष्ट तबलावादक, उत्कृष्ट झांजवादक यांना वैयक्तिक रोख बक्षीसे, भेटवस्तू व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच या भजन स्पर्धेमध्ये भाग घेण्याऱ्या प्रत्येक मंडळाला रुपये १०००/- मानधन व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. हि भजन स्पर्धा ही सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच संघांना प्रवेश देण्यात येईल.
श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित भजन स्पर्धेचे ५० वे वर्ष असल्याने हि भजन स्पर्धा ही दोन टप्यात घेणार आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर २०२५ ते बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत १० दिवस दररोज संध्याकाळी ६ ते रात्रौ १२ वा. पर्यंत ५ भजने सादर होतील. या दहा दिवसामधून अंतिम फेरीसाठी एकूण १२ मंडळे निवडण्यात येतील. या १२ मंडळांची अंतिम फेरी गुरुवार दि. २ ऑक्टोबर ते रविवार दि. ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ४ दिवस प्रत्येक दिवशी तीन भजने सादर करणेत येतील.
भजन स्पर्धेचे प्रवेश अर्ज गुरुवार दि. ११ सप्टेंबर ते शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ पर्यंत महेश कुडाळकर (मोबा नं. ९४२०२१००२०/९१५६९६७८९०) श्री कुडाळेश्वर मंदिर, कुडाळ येथे स्विकारले जातील. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजन मंडळांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!