गांजा बाळगल्या प्रकरणी संशयित आरोपी शुभम गोसावी याला जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश शेट्ये यांचा युक्तिवाद
कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील कामतसृष्टी कॉम्प्लेक्स समोरील एका भाड्याच्या घरामध्ये राहत असलेल्या ठिकाणाहून शुभम संतोष गोसावी याच्याकडून गांजा हस्तगत करत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला अटक केली होती. या कारवाईमध्ये संशयित आरोपीकडून 15 हजार रुपयांचा गांजा हस्तगत करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला मागितलेली पोलीस कोठडी फेटाळत त्याची जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश शेट्ये यांनी युक्तिवाद केला. ही कारवाई 31 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजण्याच्या च्या सुमारास छापा मारत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केली. याप्रकरणी संशयित आरोपी शुभम यांच्यावर गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) (2) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीची पोलीस कोठडी मागताना आरोपीने गांजा कुठून आणला? गुन्ह्यांमधील मुख्य सूत्रधार कोण?, तसेच सदरचा गांजा कुणाकडे द्यायचा होता? याप्रकरणी संशयित आरोपी सोबत अजून साथीदार कुणी आहेत का? सदर गुन्ह्यात अजून मोठे रॅकेट आहे का? तसेच आरोपीकडे अजून मुद्देमाला असण्याची शक्यता आहे. या मुद्द्यांवर आधारित पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र संशयित आरोपीच्या वतीने ॲड. सिद्धेश शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला.
दिगंबर वालावलकर कणकवली





