कुडाळमध्ये २२ ऑगस्टला मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव

संत राऊळ महाराज कॉलेज मध्ये आयोजन

जिल्ह्यातील ४२ कॉलेज सहभागी

मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग विभागाचा  ५८ वा युवा महोत्सव २२ व २३ ऑगस्टला संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये होत आहे. सिंधुदुर्ग विभाग अंतर्गत ४२ महाविद्यालये या युवा महोत्सवात सहभागी होतील. या युवा महोत्सव अंतर्गत विविध अशा ३९ स्पर्धा होणार आहेत. अशी माहिती संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे या महोत्सवाचे प्रमुख डॉ मंगेश जांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
   मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विभाग अंतर्गत ५८ युवा महोत्सव कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे होत आहे. याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी कॉलेजच्या प्राचार्य डॉ स्मिता सुरवसे, डॉ. प्रा. मंगेश जांबळे, प्रा रवींद्र ठाकूर, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. मिलिंद तुपेरे, प्रा. सुहास पाटील आदी उपस्थित होते.
  यावेळी बोलताना डॉ. प्रा. जांबळे म्हणाले, हा ५८ वा युवा महोत्सव असून या महोत्सवाचे उद्घाटन २२ रोजी सकाळी साडेनऊ वाजता कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरचिटणीस अनंत वैद्य, सहसचिव महेंद्र गवस, यांच्यासह प्रमुख पाहुणे सांस्कृतिक विभाग मुंबई विद्यापीठ समन्वयक डॉ. निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ आशिष नाईक, डॉ नितीन वळंजू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 
डॉ. जांबळे म्हणाले ५८ वा युवा महोत्सव हा आमच्यासाठी सांस्कृतिक महोत्सव आहे. नियोजनाची जबाबदारी संत राऊळ महाराज कॉलेजवर असून या महोत्सवात  ४२ महाविद्यालये सहभागी होणार आहेत. दि. २२ रोजी विविध स्पर्धांमध्ये पहिल्या दिवशी ३५ स्पर्धा प्रकार होणार आहेत. यामध्ये  भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत,  तालवादन, तंतुवाद्य वादन, इतर वाद्य, पाश्चिमात्य संगीत, भारतीय पारंपरिक नृत्य, लोककला, वाड्मय विभाग, वक्तृत्व मराठी हिंदी इंग्लिश, वादविवाद स्पर्धा,अभिनय स्पर्धा, कथाकथन स्पर्धा होणार आहेत. थिएटर विभाग अंतर्गत एकांकिका स्पर्धा, नाटुकली, फाइन आर्ट ऑन दी स्पॉट पेंटिंग, पोस्टल मेकिंग, शिल्पकाम, ऐनवेळी विषय देऊन व्यंगचित्र, मेंदी डिझाइन, फोटोग्राफी, असे दोन दिवस 39 स्पर्धा प्रकार होणार आहेत.  २३ रोजी प्रश्नमंजुषा, व कथा लेखन स्पर्धा होतील. तसेच ऑर्केस्ट्रा आणि कवाली या स्पर्धा थेट मुंबई विद्यापीठात घेतल्या जाणार आहेत.
या स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून मान्यवर परीक्षक परीक्षण करणार आहेत. त्यामध्ये काही सेलिब्रिटी सुद्धा असतील. असे प्रा. जांभळे म्हणाले.

error: Content is protected !!