एम. व्ही. डी कॉलेज व स्पेक्ट्रम अकॅडेमीच्या वतीने शालांत परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व करियर मार्गदर्शन कार्यशाळा

विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची कार्यक्रमासाठी उपस्थिती
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील इयत्ता दहावी महत्त्वाचा टप्पा असून, दहावीच्या निकालानंतर करियरच्या संधींबाबत योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. या हेतूने ओसरगाव येथील एम. व्ही. डी. शैक्षणिक संकुलात स्पेक्ट्रम अकॅडेमीने दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी प्रशासकीय सेवा, बँकिंग, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर स्पर्धा परीक्षांबाबत शैक्षणिक व व्यावसायिक मार्ग निवडण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कणकवली परिक्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. घनश्याम आढाव यांनी विद्यार्थ्यांना प्रशासनात देशसेवेसाठी येण्याचे आवाहन केले. “तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइलचा अभ्यासासाठी उपयोग करा, पण त्याच्या आहारी जाऊ नका” असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात स्पेक्ट्रम अकॅडेमीचे संचालक श्री. सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना दहावी नंतरच्या करियरच्या विविध पर्यायांबद्दल माहिती दिली. “विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी आणि क्षमतेनुसार प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. यशस्वी करियरसाठी नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्य आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले. तर एम. व्ही. डी. महाविद्यालयाचे संचालक श्री. कॅप्टन विलास सावंत यांनी शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. “करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी शिस्त आणि सातत्य हे दोन मूलभूत घटक आहेत,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
राष्ट्रीय सरपंच ससंद कोकण विभागाचे अध्यक्ष व युनियन बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. संतोष राणे यांनी बँकिंग क्षेत्राचे महत्त्व विशद केले. “महाराष्ट्रातील उमेदवारांचे बँकिंग क्षेत्रातील प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत,” असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
याप्रसंगी तळ कोकणातील यशस्वी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. या सोहळ्याने विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले, असे उपस्थित पालकांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
शिक्षकतज्ञ आणि लोकप्रिय शाहीर प्रा. हरिभाऊ भिसे यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून दिले. “विद्यार्थीदशेत नियमित योग, प्राणायाम आणि व्यायाम केल्याने शरीर आणि मन सदृढ राहते, जे यशस्वी करियरसाठी आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
स्पेक्ट्रम अकॅडेमीचे प्रा. अंकुश माकोडे यांनी UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमधील करियरच्या संधी, अभ्यासपद्धती आणि तयारीबाबत मार्गदर्शन केले. तर प्रा. राखी व्यास यांनी JEE, NEET आणि CET सारख्या प्रवेश परीक्षांबाबत माहिती देताना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकला
या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन स्पेक्ट्रम अकॅडेमीचे प्रा. तांबोळी यांनी केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या श्री. राजेश जगताप, जगदीश कांबळे, भाग्यश्री शृंगारे, गौरी बनसोडे, सोनाली आवळे, प्रियांका शिंदे, आदींचे आभार मानले.