सिंधुदुर्गातील रेल्वेच्या समस्येबाबत सोमवारी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्यांबाबत दर तीन महिन्यांनी समन्वय, संघर्ष समिती सोबत संयुक्त बैठक घेणार
पालकमंत्री नितेश राणे यांचे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय, संघर्ष समितीला आश्वासन
कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी येणाऱ्या समस्या आणि गैरसोयी यामधील प्रामुख्याने तिकीट, जलद गाड्यांना थांबा , नविन गाड्या ,गणपती स्पेशलगाड्या सावंतवाडी मडूरा पर्यंत सोडणे यासह अन्य प्रश्नाबाबत सोमवारी केद्रीय रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांच्या सोबत बैठक घेत योग्य तो तोडगा काढला जाईल. प्रवाशांच्या या प्रश्नाबाबत दर तीन महिन्यांनी आपली संयुक्त बैठक घेऊन समस्यांचे निराकरण केले जाईल अशी ग्वाही राज्याचे मत्स्य उद्योग बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सोबत झालेल्या बैठकीत दिली.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समिती सिंधुदुर्ग या संघटनेच्या माध्यमातून पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली व विवीध मागण्याचे निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या निवेदनाद्वारे दिलेल्या समस्यांचे निराकरण करू. उद्याच्या सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या सोबत चर्चा करून निवेदनात दिलेल्या प्रत्येक प्रश्नावर सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील. या बैठकीनंतर सातत्याने आपली पुन्हा चर्चा होईल. कोकण रेल्वेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधिकारी मिळावा. अशी मागणी रेल्वे मंत्र्यांकडेही करू आणि दर तीन महिन्यांनी प्रवासी संघटना आणि मी अशी संयुक्त बैठक घेऊ अशी ही ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पावसकर , जिल्हा समन्वयक नंदन वेगुर्लेकर , सचिव अजय मयेकर ,संतोष राणे , सुरेश सावंत ,निता राणे , जयेद्र परब ,बाळा सातार्डेकर ,संजय वालावलकर , किशोर जैतापकर , तेजस आंबेकर, महेश रावराणे , रमेश जामसांडेकर आदीसह उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्षवेधताना संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, मडुरा, सावंतवाडी या सर्व १० रेल्वे स्टेशन वरील प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही स्टेशनवर न थांबणाऱ्या १६ जलद गाड्यांना विविध रेल्वे स्टेशन जवळ कायमस्वरूपी थांबा मिळावा यासाठी मागील ३ वर्षांपासून आम्ही कार्यरत आहोत. परंतु बेलापूर आणि आर आर एम रत्नागिरी तसेच विविध लोकप्रतिनिधी यांच्याशी सतत पत्रव्यवहार व संपर्क करूनही तसेच दि. १५ ऑगष्ट २५ रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करूनही कोणतीही प्रमुख मागणी मान्य झालेली नाही. तरी पुढील गणेशोत्सव सण लक्षात घेऊन आमच्या प्रमुख मागण्या आम्ही पुन्हा एकदा आपल्याकडे देत आहोत.
येत्या २७ ऑगस्ट २५ रोजी कोकणातील सर्वात मोठा गणेश चतुर्थी सण असून आजच्या घडीला मुंबईकर चाकरमन्यांसाठी एकही गाडीची बुकिंग शिल्लक राहिलेली नाही. दिनांक २५ ऑगस्ट ते १० सप्टेबर २५ या कालावधीत मडुरे ते दादर व सावंतवाडी ते सीएसटीएम अश्या दोन नवीन गाड्या तात्काळ सुरु कराव्यात. तसेच प्रवाशांचा प्रतिसाद पाहून सदरील दोन्ही गाड्या कायमस्वरूपी चालू ठेवाव्यात. माडूरे ते रत्नागिरी अशी दररोज लोकल पॅसेंजर गाडी (सावंतवाडी ते मंडगाव या धर्तीवर) तात्काळ चालू करावी.सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन, वैभववाडी रेल्वेस्टेशन व नांदगाव रेल्वेस्टेशन या ठिकाणी पीआरएस सुविधा तात्काळ सुरु करावी. सिंधुदुर्ग स्टेशन हे जिल्हा मुख्यालयाचे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्यकार्यकारी अधिकारी, . न्यायाधीश इ. प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये या ठिकाणी आहेत. तसेच मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, कृषी कॉलेज, नर्सिंग कॉलेज इत्यादी ठिकाणी परराज्यातील विद्यार्थी प्रवेश घेतात व त्यांच्या ये-जा सुविधेसाठी प्रमुख आवश्यक गाड्या सिंधुदुर्ग स्टेशनवर थांबणे गरजेचे आहे. या स्टेशन वरून मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला व समुद्र किनारी पर्यटन साठी जाणाऱ्या प्रवाशांना सिंधुदुर्ग स्टेशन नजीकचे स्टेशन आहे. यासाठी या स्टेशनवर नेत्रावती, जनशताब्दी व ‘ काही अन्य जलद गाड्यांना थांबा मिळावा. सावंतवाडी रेल्वे स्टेशनला कायमस्वरूपी सावंतवाडी टर्मिनल्स असे नामकरण करावे आणि आवश्यक सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा.कोकण रेल्वे च्या नियोजित प्लॅन मध्ये कसाल रेल्वेस्थानक मंजूर होते. परंतु रेल्वे प्रशासनाकडून गेले २५ वर्षे होऊन सुद्धा त्या संदर्भात अजूनही कार्यवाही झालेली नाही तरी पुढील 3 महिन्यात नवीन कसाल रेल्वेस्थानक सुरु करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्टेशन अप्रोच रोडची दुरुस्ती करणे, फ्लाय ओव्हर ( पीओबी) बांधणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, डिजिटल बोर्ड लावणे, प्लॅटफॉर्म वरील निवारा शेड बांधणे, पिण्याच्या पाण्याची पाणपोई दुरुस्ती करणे, स्वच्छता गृह दुरुस्ती करणे, ड्रेनेज व्यवस्था करणे अशा सर्व सुविधा तात्काळ निर्माण कराव्यात. नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करावी. कुडाळ रेल्वे स्टेशन पासून मालवणच्या दिशेने जाणारा रस्ता दुरुस्त करणे बाबत कार्यवाही करावी.खारेपाटण, आचिर्णे व इतर रेल्वे स्टेशन वर चढणे उतरणे यासाठी किमान रेल्वेच्या लांबी इतकी प्लॅट फॉर्म सुविधा असावी.कोकण रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालेल्या करारा प्रमाणे खारेपाटण ते मडूरे स्टेशन रस्ते व सुविधा पुरवाव्यात. यातील खारेपाटण, वैभववाडी, नांदगाव झाराप, मडूरे स्टेशनचे रस्ते करण्याबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभागाशी प्रस्तावित काम मंजूरी बाबत प्रयत्न करणे.
. कोकण रेल्वे ट्रॅकवर एकूण ७५ रेल्वे धावतात त्यापैकी १६ रेल्वे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही स्टेशन वर थांबत नाहीत. सावंतवाडी-दादर तुतारी रेल्वेमध्ये एल एचबी रेक मध्ये अपग्रेड केल्याने प्रत्येक कोच मध्ये ८ सीट वाढतील व १८ कोच वरून २२ कोच करण्यात यावेत. मंडगाव सीएसटिएम मांडवी एक्सप्रेसला नांदगाव स्टेशनचा थांबा मिळावा,उधना- मैंगलोर (ट्रेन नं. 0 ९०५७-५८) सिंधुदुर्ग स्टेशनला थांबणारी व नागपूर- मडगाव (ट्रेन नं. 0 ११३९- ४०) कणकवली स्टेशनला थांबणारी या दोन विशेष ट्रेन कायमस्वरूपी करण्यात याव्यात. उर्वरित ५ रेल्वेस्टेशनवर स्थानिकाना कॅटिन सुविधा चालू करण्यास मान्यता दयावी. तरी या मागण्याआपल्या स्तरावर रेल्वे स्टेशनच्या मागण्या मंजूर व्हाव्यात अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला.
दिगंबर वालावलकर कणकवली