अनुभव हाच सर्वात मोठा गुरू – उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब

तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन
काळ बदलला व काळाबरोबर शिक्षणांची माध्यमेही बदलली आणि त्याचबरोबर शिक्षकांच्या समोरची आव्हानेही बदलली आहेत,दिवसेंदिवस शिक्षण हे जटिल होत चालले आहे, शिक्षणात खूप मोठी स्पर्धा वाढली आहे. आज विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात कस लागत असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणारे,आणि सामाजिक भान ठेवून अनेक उपक्रम राबविणारा तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ निश्चितच कौतुकास पात्र असल्याचे गौरवोद्गार सिंधुदुर्ग जि.प.चे नूतन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी तळेरे येथे काढले,
तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्यावतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात श्री.परब बोलत होते.
. तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या आद्य पत्रकार, दर्पणकार,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या व्यक्तिचित्र रंगभरण स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालयाच्या डॉ.एम्.डी.देसाई सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.
अनुभव हाच सर्वात मोठा गुरू!
जयप्रकाश परब पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी यश-अपयशाचा विचार न करता प्रत्येक स्पर्धेत सहभागी होत रहावे, कारण अनुभव हा आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे गुरु असतो.ग्रामीण भागातील मुलेही शहरी भागातील मुलांच्या तुलनेने मागे राहणार तर नाही ना ! ही काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
समाजाच्या मनांतील अपेक्षा पुर्ण करण्याची जबाबदारी पत्रकार उचलतात -संजय पाताडे
दिवसरात्र न थकता सेवा देणारा सेवक म्हणजे पत्रकार होय.पत्रकार हा आपले दायित्व सांभाळू, जबाबदारीने समाजिक बांधिलकी सांभाळून कार्य करणारा घटक असतो. की,जे तुमच्या-आमच्या आणि समाजाच्या मनात ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्याची जबाबदारी पत्रकार उचलतात असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार संजय पाताडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले.
………………………………………….
दरम्यान विद्यार्थी गुणगौरव समारंभात रंगभरण स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन तसेच सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.या कार्यक्रमला सर्व शाळांचे गुणवत्ता धारक विद्यार्थी आणि या स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी तसेच वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सिंधुदूर्गचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब,तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कासार्डे शैक्षणिक संस्थचे स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष -संजय पाताडे होते. तसेच तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुदवडकर, वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ.धनलक्ष्मी तळेकर-राणे, शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर, प्रविण वरुणकर, निलेश सोरप, दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, स्व.सुनील तळेकर वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुरुवातीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तर सरपंच हनुमंत तळेकर व प्रा.हेमंत महाडिक यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
त्यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कासार्डे गावचे सुपुत्र आणि नव्यानेच जि.प.सिंधुदूर्गच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी या महत्त्वाच्या पदांवरती नव्यानेच रुजू झालेले जयप्रकाश परब यांचा पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष उदय दुधवडकर यांच्या हस्ते तसेच तळेरे सरपंच हनुमंत तळेकर यांनी गावच्यावतीने आणि विद्यालयाच्यावतीने सौ.धनलक्ष्मी तळेकर-राणे यांनी शाल,श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन ह्रदय सत्कार करण्यात आला. तसेच अन्य मान्यवरांचा देखील सत्कार व स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय दुदवडकर यांनी करताना या रंगभरण स्पर्धेला पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल शाळा व स्पर्धेकांचे विशेष कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकेत पावसकर यांनी केले तर शेवटी आभार सचिन राणे यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या सर्वच सभासदांनी विशेष मेहनत घेतली.