संत राऊळ महाराज महाविद्यालयमध्ये मानवी तस्करी विरोधीदिन साजरा

लघुपट प्रदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन
कुडाळ : – संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे द गार्डियन या लघुपटाचे प्रदर्शन व चर्चा असा अभिनव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे होत्या. महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. शरयू आसोलकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना प्राचार्या डॉ. सुरवसे म्हणाल्या की, मानवी तस्करी विरोधी दिन दिनानिमित्त लघुपटाद्वारे हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. मानवी तस्करी छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात होत असते. त्याला प्रामुख्याने स्त्रिया बळी पडतात. त्यांचे अनेक प्रकारचे शोषण होते. शिवाय मानवी तस्करी मानवी अवयवांच्या चोरीसाठीही होत असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांबाबत आजच्या तरुण पिढीने सतर्क राहणे गरजेचे आहे.
उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीने सुचिता मांजरेकर हिने अशा कार्यक्रमांची आवश्यकता कशी आहे याविषयी मत व्यक्त केले.
यावेळी कॅ.डॉ. एस. टी. आवटे, डॉ. व्ही. जी. भास्कर, डॉ. बी. ए. तुपेरे, डॉ. कमलाकर चव्हाण, प्रा.अनुराधा गावडे, प्रा. स्वप्नजा चांदेकर आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.