जप्त डंपरचा मालक असल्याचे भासवून न्यायालयाची फसवणूक

तळवडे येथील एकास अटक ; तीन दिवसांची पोलीस कोठडी
कुडाळ : जप्त केलेल्या डंपरचा मालक असल्याचे भासवून आणि तसे खोटे शपथपत्र सादर करून न्यायालयात अर्ज सादर केला. मयत भावाची बनावट स्वाक्षरी केली आणि माननीय न्यायालयाचे आदेश प्राप्त करून तो जप्त केलेला डंपर ताब्यात घेतल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी रुपेश रमेश सावंत (वय ३४ वर्षे, रा. तळवडे, बादेवाडी, ता. सावंतवाडी) याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला आज कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा ७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ ते १३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडला. तर या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार जनार्दन तुकाराम झारापकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ३० जुलै रोजी रात्री १.५९ वाजता गुन्हा दखल करण्यात आला. फिर्यादनुसार वरील तारखेस वेळी व यातील संशयित आरोपी याने कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजी नंबर 0047/2025 BNS 2023 चे कलम 303 (2), खाण व खनिज अधिनियम कलम 21 मधील जप्त वाहन डंपर क्रमांक MH 07 C 5577 चा मालक असल्याचे भासवून व तसे खोटे शपथ पत्र तयार करून नमूद वाहनाचा ताबा मिळण्यासाठी मा.दंडाधिकारी वर्ग 1 कुडाळ यांच्या न्यायालयात फौ. की अर्ज क्रमांक 14/2025 दि.07.03.2025 अन्वये अर्ज दाखल केला. तसेच मयत भाऊ प्रवीण रमेश सावंत याची बनावट स्वाक्षरी करून त्या आधारे माननीय न्यायालयाचे आदेश प्राप्त केले. त्या आदेशान्वये नमूद वाहनाचा मालक आपण स्वतः असल्याचे भासवून व तशी बनावट कागदपत्रे सादर करून नमुद वाहन ताब्यात घेतले आणि मा.न्यायालयाची व फिर्यादी याची फसवणूक केली.
या प्रकरणी संशयीत आरोपी रुपेश रमेश सावंत याला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्याला आज कुडाळ न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डंपर अजून ताब्यात घेतलेला नाही अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. या प्रकरणी कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी भेट देऊन माहिती घेतली. सपोनि श्री. आडकुर अधिक तपास करीत आहेत.