फोंडाघाट हायस्कूलच्या कु. मनस्या फाले हिला सुवर्णपदक

ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग( फायरिंग ) मध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
न्यू इंग्लिश स्कूलच्या इयत्ता नववी मधील कु.मनस्या निलेश फाले या विद्यार्थिनीने अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प सर्विस शूटिंग( फायरिंग ) मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत, सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे मनस्याने सुवर्णमय कामगिरी करताना, न्यू इंग्लिश स्कूल – फोंडाघाट प्रशालेने प्रथमच राष्ट्रीय स्तरावर झेप घेत, ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव तिने राष्ट्रीय स्तरावर पोचविले आहे. या दैदिप्यमान यशामुळे मनस्येच्या या यशाबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मनस्येच्या घरची प्रतिकूल आणि गरिबीची परिस्थिती. वडील भाजी विक्रेते. शैक्षणिक वातावरण किंवा पार्श्वभूमीची कुटुंबात वाणवा. मात्र मार्गदर्शक शिक्षकावरील विश्वास आणि वडिलांचा संपूर्ण पाठिंबा या जोरावर मनस्यांने ओरस येथून पाच जिल्ह्याच्या खेळाडूंमधून कोल्हापूर शूटिंग कॅम्प येथे थेट राज्यस्तरावर झेप घेतली. आणि अमरावती येथे ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प शूटिंग स्पर्धेत सुवर्णवेध घेऊन सुवर्णपदकासह राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली.मनाचा निग्रह, अथक परिश्रम, जिद्द आणि मार्गदर्शक शिक्षकावरील दृढ विश्वास यांच्या जोरावर आत्मविश्वासाने ओरस पासून कोल्हापूर मार्गे अमरावती येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेले निवड आणि प्रवास मित्र-मैत्रिणीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारा आहे.
मनस्याला ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग चे सीईओ दीपक दयाळ शर्मा,ए. ओ. कर्नल तनुज डी. मंडलिक, सुभेदार मेजर कुलदीपकर सुधाकर, सर्व पीआय स्टाफ, प्रशालेचे आर्या भोगले,एम.डी. लाड, अजिंक्य पोफळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन म. ज. सावंत, सचिव चं. शा. लिंग्रस, खजिनदार वी.रा. तायशेटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष द. दि.पवार,सर्व संचालक तसेच प्रशाळेचे मुख्याध्यापक पी. के. पारकर, सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी यांनी मनस्याचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावरील शूटिंग स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मनस्या च्या यशाचे पंचक्रोशी कौतुक होत आहे. सिंधुदुर्गातील आंबोली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी संस्कार धुरी यांनी मिळविलेल्या सुवर्णपदक साठी मार्गदर्शक व त्याचे प्रशिक्षक निखिल तेली हे सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचेच विद्यार्थी आहेत.