आचरे गाऊडवाडी शाळेचा अनोखा उपक्रम

विद्यार्थ्यांनी घेतला शेतीच्या कामाचा अनुभव
आचरा-अर्जुन बापर्डेकर
हल्लीच्या यंत्रशक्तीच्या युगात दिवसेंदिवस श्रमशक्तीकडे दुर्लक्ष होत चालले आहे. सारे काही बाजारात सहज उपलब्ध होते त्यामुळे कष्टकरी लोकांचे जीवन कसे असते हे मात्र अनेकांच्या लक्षात येत नाही. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना कष्टाचे धडे मिळावेत , शेती विषयक कामाचा अनुभव मिळावा, शेती करण्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या शाळचे उपक्रमशील शिक्षक राजेश भिरवंडेकर यांनी मुलांना शेतीची सफर घडवून शेतात चिखल करत लावणी करण्याचा अनोखा अनुभव दिला.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आचरे गाऊडवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस बळीराजासाठी अर्थात बांधावरची शाळा या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने आयोजन केले होते. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी शेतीच्या विविध कामांची माहिती करून घेतली… भात पिकाची लावणी प्रत्यक्षात कशी केली जाते याचा अनुभव घेतला. बी पेरल्यापासून अन्न आपल्या ताटात येईपर्यंत शेतकऱ्याला कराव्या लागणाऱ्या कामांचे महत्त्व जाणून घेतले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने विशेष मेहनत घेतली. शाळेचे मुख्याध्यापक राजेश भिरवंडेकर, सहशिक्षिका श्रीमती ज्योती गवळी, श्रीमती सार्थकी जोशी यांनी सदर उपक्रम नियोजनपूर्वक राबवित मुलांना अनोखा अनुभव मिळवून दिला .