सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा, बीएसएनएलचे नेटवर्क सक्षम करा

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली मुंबईत बैठक, मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांची उपस्थिती

पर्यटन जिल्ह्याला जलद आणि स्थिर नेटवर्कची गरज

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीएसएनएल नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत बीएसएनएलचे मुख्य महाप्रबंधक हरिंदर कुमार यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील नेटवर्क सुधारण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा यावेळी झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीएसएनएलचे टॉवर अनेक ठिकाणी असूनही ग्राहकांना समाधानकारक सेवा मिळत नाही. विशेषतः ग्रामीण भागात ही समस्या अधिक जाणवते. सिंधुदुर्ग हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असल्यामुळे येथे जलद आणि स्थिर नेटवर्क असणे अत्यावश्यक आहे. ही बाब बैठकीत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली गेली. यास अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यासोबत दर तीन महिन्यांनी नेटवर्क सुधारणा प्रगती अहवाल सादर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी ओरोस येथील सिंधुदुर्ग नगरी येथे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सव काळात नेटवर्क बाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. जिल्ह्यात बीएसएनएलचे टॉवर असले तरी ग्राहकांना नेटवर्क मिळत नसल्याची तक्रार कायम आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देताना पालकमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पुढे बीएसएनएल नेटवर्कबाबत एकही तक्रार येता कामा नये.”

error: Content is protected !!