समाज मनाचे दुःख मांडणारे संमेलन यशस्वी-संध्या तांबे

जिथे परिवर्तन व चळवळ आहे तिथेच साक्षात विठ्ठल आहे- विठ्ठल कदम

सामाजिक जाणिवेबरोबरच साहित्य संस्कृती जपण्याचे कार्य-विजय चव्हाण

जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम

आज कालच्या मोबाईल संस्कृतीतही कवी साहित्य संमेलन यशस्वी होते. कवी संमेलनात समाज मनाचे दुःख मांडलं जातं. आपण शब्द ऐकतो ते हृदयात राहतात, कविता करतो त्या ओळी कधी पुसट होत नाहीत.चर्मकार समाज उन्नती मंडळांने पुढाकार घेऊन संपन्न केलेले साहित्य कवी संमेलन सर्व समाज मंडळांना आदर्शवतच आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री संध्या तांबे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांचे विद्यमाने व सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने जिल्हास्तरीय मराठी साहित्य कवी संमेलनाचे आयोजन कट्टा येथे ओम साई गणेश मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी कवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका संध्या तांबे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या साहित्य कवी संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य विठ्ठल कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी साहित्यिक, कवी श्री. कदम यांनी आपले विचार मांडताना आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व साहित्यिक जणू पंढरीच्या वाळवंटात सामाजिक विचार पेरत आहेत असा भास होत असल्याचे सांगितले. आज पददलीत समाज पुढे गेला आहे. जिथे परिवर्तन आहे व जिथे चळवळ आहे तिथे साक्षात विठ्ठल आहे.चर्मकार समाज उन्नती मंडळाचे कार्य सर्वांनाच प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना लेखक,कवी,रंगकर्मी व रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय चव्हाण यांनी एखाद्या समाज मंडळाने प्रथमच आयोजित केलेले हे साहित्य संमेलन आहे त्यामुळे याची नोंद विशेष करून घेतली जाईल.चर्मकार उन्नती मंडळ ज्या प्रकारे सामाजिक जाणिवेतून कार्य करत आहे,त्याचप्रमाणे साहित्य संमेलनाच्या रूपाने संस्कृती जपण्याचे कार्य करत आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
जिल्हास्तरीय मराठी साहित्य कवी संमेलनाची सुरुवात कवयित्री आर्या ईळकर /चव्हाण यांनी आपल्या “क्षण क्षण फुलताना” या कवितेने केली.यात त्यांनी ‘तरी कळ्यांनी फुलण्याआधीच कोमेजायचे, क्षण क्षण फुलताना तिनेच का झुरायचे’ असे भाव व्यक्त केले. कवी संजय तांबे यांनी “बेटी बचाव” या विषयावर कविता सादर करताना ‘कळ्या उमलण्याआधी त्या फुंकल्या जातात’ अशा भावना व्यक्त केल्या. कवी राजेंद्र गोसावी यांनी “घडावी तुझी आषाढी वारी” ही कविता सादर करताना ‘हातावरले पोट माझे, नाव घेऊनी करतो कामास सुरुवात’ अशी आर्त हाक दिली. कवी सतीश चव्हाण यांनी “धुमशान”ही कविता सादर करताना ‘पावसार पावस कित्येक बघितले पण मिरगा आधी पावसाचा असा धुमशान कधीच बघितला नाय’ असे अवकाळी पावसावर भाष्य केले. कवयित्री शामल चव्हाण यांनी “निशब्द” कविता सादर करताना ‘निशब्द झाले माझे शब्द’ अशा भावना व्यक्त केल्या. कवयित्री प्रज्ञा मातोंडकर यांनी “बाईपण भारी देवा” ही कविता सादर करताना ‘बाई पण आहे का भारी?’ असा सवाल उपस्थित केला. कवी मधुकर जाधव यांनी “आत्महत्या” ही कविता सादर करताना ‘जीवन अनमोल आहे पुन्हा कधी मिळणार नाही’ असे सांगताना समाजातील तरुणांना आत्महत्या करू नका असा सल्ला दिला. कवी ऍड. सुधीर गोठणकर यांनी “वारी” ही कविता सादर करताना ‘चोर लुटारुही आता झालेत वारकरी, पूर्वीसारखी निर्मळ राहिली नाही आता निर्मळवारी’ अशा भावना व्यक्त केल्या. कवी दिलीप चव्हाण यांनी “बाय” ही कविता सादर करताना ‘स्वाभिमानान कसा जगूचा ती शिकवता माझी बाय’ अशी आपल्या आजी वरील कविता सादर केली.कवयित्री प्रगती पाताडे यांनी “कविता म्हणजे काय?” या कवितेत ‘सत्य असत्य उलगडून जगण्याचे देई भान,जन मनावर घाव घाली,जगण्याचा बोध ती कविता’ असे कवितेचे महत्व विशद केले. कवी सुरेश पवार यांनी “मन” या कवितेत ‘असे विचित्र हे मन,जरा ताब्यात ठेवूया,जो त्या ठेवितो ताब्यात त्यास माणूस म्हणूया’ असे मनाचे अंतरंग उलगडले. कवी मनोहर सरमळकर यांनी “आषाढ सरी” ही कविता सादर करताना ‘आल्या आल्या सरी आषाढाच्या सरी’ असे आषाढातील पावसाचे वर्णन केले.कवी अमर पवार यांनी “कोकण” या कवितेतून ‘कोकण माझो लय साधो, बाहेरून काटो पण आतून लय गोडो’ असे कोकणचे वर्णन मांडले.कवी मधुकर मातोंडकर यांनी “बाजारमूल्य” ही कविता सादर करताना ‘माणसाला भंगारात काढण्यासाठी कोणी बाजार भरवत नाही,पण माणूस भंगारात काढला जातो हेही दुर्दैवच असते’ अशी माणूसपण हरवत चालली असल्याची खंत मांडली.कवी विजय चव्हाण यांनी आपल्या “संगला” या कवितेत ‘वर्षाचो राखणदार शेताचो ठिकाणदार, राखण तेचि देवची आसता, फसवून जमत नसता,शब्द पाळूचो आसता,नायतर वाडवाळ करता’ असे प्रेमात धोका मिळालेल्या माणसाच्या व्यथा मांडल्या. कवी विठ्ठल कदम यांनी ‘”आठ आणे आणि गुळाचा खडा” ही ह्रदयस्पर्शी कविता सादर करताना ‘गुळाच्या ढेपेला मुंग्याही डसल्या होत्या,मुंग्या एवढी आपली लायकी नाही’ असे वास्तववादी गरिबीचे विदारक चित्र मांडले.कवयित्री संध्या तांबे यांनी आपल्या कवितेतून बाप मनाच्या वेदना मांडताना “ते मागत नाहीत कधी कोणाकडे दयेची भीक,तेव्हा वडील खूप उंचावर असतात, त्यांच्या पावलांपर्यंत आमचे हात पोचण्यापलीकडे” अशी भावना व्यक्त केली.
कवी संमेलनात संयोजक व मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संयोजक मंडळाचे पदाधिकारी नामदेव जाधव,महेंद्र चव्हाण,राजेंद्र चव्हाण,हरेश चव्हाण,उदय शिरोडकर,उत्तम चव्हाण,सहदेव शिरोडकर,सुहास मोचेमाडकर तसेच कृष्णा पाताडे,वसंत चव्हाण,सुरेश चौकेकर,पंडित माने,सूर्यकांत दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.मराठी साहित्य कवी संमेलनाचे प्रास्ताविक मंडळाचे साहित्य सांस्कृतिक समिती प्रमुख सुरेश पवार यांनी केले.संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी केले.शेवटी आभार मंडळाचे सदस्य मंगेश आरेकर यांनी मानले.

error: Content is protected !!