रोटरी क्लब ऑफ वैभववाडीतर्फे शिडवणे नं. १ शाळेला वॉटर कूलर फिल्टर भेट; ‘वॉटरबेल’ उपक्रम सुरू

शिडवणे , २१ जून २०२५: जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आज रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने शिडवणे नं. १ शाळेला वॉटर कूलर फिल्टर प्रदान करण्यात आले. रोटरीयन असिस्टंट जनरल डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली हा वितरण सोहळा पार पडला. या महत्त्वपूर्ण भेटीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये, रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर, रोटरी क्लब खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, सेक्रेटरी सचिन रावराणे, चार्टर्ड प्रेसिडेंट संतोष टक्के, सुनील रावराणे, मंगेश कदम, सलोनी टक्के, डॉ. संजय कोकाटे, निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुप्रिया पाष्टे, उपाध्यक्षा संचिता टक्के, शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे, अन्वी येतकर, प्रेरणा कासार्डेकर, बाळकृष्ण सुतार, शालेय पोषण आहार स्वयंपाकी समिता सुतार, उपशिक्षिका सीमा वरुणकर, हेमा वंजारी आणि सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी केले. डॉ. विद्याधर तायशेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या कार्याचे कौतुक केले. संतोष टक्के यांनी शिडवणे नं. १ शाळा “माझी शाळा” असल्याने तिला मदत करताना विशेष आनंद होत असल्याचे सांगितले. दयानंद कोकाटे यांनी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या या अनमोल भेटीबद्दल शाळेच्या वतीने आभार मानले, तर डॉ. संजय कोकाटे यांनी जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या मोठ्या क्लबने केलेल्या सहकार्याची प्रशंसा केली. रवींद्र जठार यांनी वैभववाडी रोटरी क्लबचे शिडवणे गावाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष प्रशांत गुळेकर यांनी शिडवणे नं. १ शाळेच्या प्रगतीसाठी या शाळेची निवड करून एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक भेट दिल्याचे नमूद केले आणि रोटरी क्लबच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी तळेरे भागात रोटरी क्लब स्थापन होण्याबद्दल आपली इच्छा व्यक्त केली.
मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी रोटरी क्लब ऑफ वैभववाडीने दिलेल्या या महत्त्वाच्या वॉटर कूलर फिल्टर भेटीबद्दल शाळेच्या सर्व समित्यांच्या वतीने आभार मानले. त्यांनी या प्रसंगी शाळेत आजपासून ‘वॉटरबेल’ नावाचा एक नवीन उपक्रम सुरू करणार असल्याची घोषणा केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना नियमितपणे पाणी पिण्याची आठवण करून दिली जाईल.