कणकवलीत फ्लाय ओव्हर ब्रिज च्या वरील भागाला मोठा तडा

पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
दोन दिवसात टेक्निकल टीम सदर घटनेची पाहणी करणार
पुलाच्या काँक्रीट चा काही भाग कोसळण्याची भीती
कणकवली शहरातील नेहमीच वादात अडकलेल्या आणि चर्चेत राहिलेल्या फ्लाय ओव्हर ब्रिज च्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील स्टेट बँके समोरील पिलर क्रमांक 3 च्या ठिकाणी पिलर च्या जॉईंट असलेल्या रस्त्याच्या पृष्ठभागाच्या खालील सर्विस रस्त्याच्या बाजूस फ्लाय ओव्हर ब्रिजच्या काँक्रीट च्या काही भागाला एक मोठा तडा गेल्याची घटना समोर आली आहे. तसेच साधारण तीन ते चार फुटाचा एक काँक्रीट चा तुकडा देखील निघालेल्या स्थितीत दिसून येत असून तो सर्विस रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी किंवा वाहनांवर कोसळण्याची देखील भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे या पुलाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या घटनेमुळे व यापूर्वी याच पुलाच्या संदर्भात घडलेल्या घटनांमुळे हा पूल खरोखरच वाहतुकीस योग्य आहे का? या पुलावरून वाहतूक करणे सुरक्षित आहे का? तसेच पुलाखालून देखील वाहतूक किंवा रहदारी कोणाच्या जीवावर बेतणार नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान गेले दोन दिवसापासून ही बाब प्रकर्षाने निदर्शनास येत असून याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये देखील या घटनेमुळे चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण पसरले आहे. कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रिज चा काही भाग यापूर्वी कोसळला होता. त्यानंतर झालेले आंदोलन व घडलेल्या घटना यांनी कणकवलीतील फ्लाय ओव्हर व बॉक्सेल ब्रिज हे राज्यभरात चर्चेत आले होते. याच बॉक्सेल ब्रिजचा एस एम हायस्कूल जवळ एक भाग खचल्याने तर दुसऱ्या बाजूचा काही भाग कोसळल्याने गेली तीन वर्ष महामार्गावर फ्लाय ओव्हर ब्रिज वर या कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी आजही बॅरिकेट लावलेल्या स्थिती हे ब्रिज अस्तित्वात आहे. परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाकडून घेण्यात आलेला नाही. दरम्यान आजही महामार्ग प्राधिकरण ला हे पुल खचण्याची दुर्घटना घडणार नाही? याची शाश्वती नसल्याचेही यावरून दिसून येत असल्याची चर्चा जनतेमध्ये आहे. दरम्यान कणकवलीत पिलर क्रमांक 3 हा स्टेट बँके समोर येत असून या पिलर वर फ्लाय ओव्हर ब्रिजचे वरील काँक्रीटचे दोन्ही भाग ज्या ठिकाणी एकत्रित होतात त्यापासून रस्त्याची ब्रिजवरची संरक्षण भिंत पर्यंतच्या पुलाच्या खालील भागाला पूर्णता भेग गेल्याचे दिसत आहे. दरम्यान त्या ठिकाणी काँक्रीट चा काही भाग हा भविष्यात कोसळू शकतो अशाही स्थितीत असल्याचे दिसत आहे. परंतु याबाबत महामार्ग प्राधिकरण किंवा जबाबदार प्रशासनाकडून कोणतीही या ठिकाणी अद्याप कार्यवाही केलेली दिसत नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकाराबाबत महामार्ग प्राधिकरण च्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज शनिवारी सदर जागेची पाहणी केली असून येत्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी तंत्रज्ञांची टीम घटनास्थळी येणार आहे. व त्यानंतर याबाबत पुढील काय उपाययोजना कराव्या लागतील किंवा या संदर्भात धोका आहे किंवा कसे हे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु एकूणच कणकवलीत यापूर्वी फ्लाय ओव्हर ब्रिजच्या अनुषंगाने घडलेल्या घटनांचा विचार करता महामार्ग प्राधिकरण या बाबत ठोस निर्णय घेणार का? तसेच फ्लाय ओव्हर ब्रिजवर आजही तीन वर्षानंतर लावलेली बॅरिकेट हटवून महामार्ग चा फ्लाय ओव्हर ब्रिजवरील भाग वाहतुकीस निर्धोक करणार का? असाही सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली