सिंधुदुर्गातील भजनीबुवांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न.

पालकमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्र्यांच्या सहकार्याने भजन कलेला शासन दरबारी न्याय मिळवून देणार- संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे.
कणकवली/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनीबुवांचा भव्य मेळावा नुकताच कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भजनी कलाकार उपस्थित होते.जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या “भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग”या संस्थेचा हा पाहिला भव्य मेळावा आणि जनरल सभा होती.नव्याने स्थापन झालेल्या संस्थेची ध्येय-धोरणे ठरविणे तसेच घटना निश्चित करणे आणि सर्वानुमते घटनेला मान्यता देणे आणि भजनीबुवांच्या इतर विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला “गुरु ब्रह्मा गुरु विष्णु” आणि “माणसाने माणसाशी माणसासम वागणे,हीच आमुची प्रार्थना” ही दोन प्रार्थना गीते गाऊन भजनी बुवांच्या या मेळाव्याला सुरुवात झाली.उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर संस्था अध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी उपस्थित सर्व भजनी कलाकारांना निर्माण केलेली घटना वाचून दाखवली व सर्वांच्या परवानगीने त्या घटनेला मान्यता घेतली.तसेच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहिलेल्या विविध भजनी कलाकारांनी असंख्य विषय मांडत भजनी कलाकारांच्या हितासाठी संस्थेची पुढील वाटचाल कशी असावी यावर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांच्या सहकार्याने भजनी कलाकारांचे विविध प्रश्न मार्गी लावून भजनी कलेला शासन दरबारी न्याय मिळवण्यासाठी अविरत प्रयत्न करणार.असे आश्वासन यावेळी दिले संस्थाध्यक्ष बुवा संतोष कानडे यांनी उपस्थितांना दिले.
सर्व भजनी कलाकारांना सोबत घेऊन आम्ही ही भजन संस्था पुढे नेऊ.भजनी कलाकारांकडून सादरीकरण करत असताना जरी चुका झाल्या तरी तेही आपल्याच परिवारातील असल्यामुळे त्यांना समजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करून भजनी कलाकारांच्या हितासाठी कार्य करू आणि त्यांच्या पाठीशी उभे राहू अश्या शब्दात यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बुवा प्रकाश पारकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या मेळाव्या प्रसंगी जिल्ह्यातील प्रसिद्ध समालोचक राजा सामंत तसेच प्रसिद्ध भजन सम्राट भालचंद्र केळुस्कर बुवा,जुने जाणते भजन सम्राट विजय परब बुवा आणि असंख्य भजनी कलाकारांनी आपली मनोगते व्यक्त करत संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.भजनी कलाकारांच्या विविध विषयांवर चर्चा संपन्न झाल्यानंतर.सर्वानुमते निवड झालेले संस्था अध्यक्ष संतोष कानडे बुवा व इतर सर्व पदाधिकारी यांचे उपस्थित भजनी कलाकारांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत तसेच अभिनंदन केले.
हा भजनीमेळा अतिशय आनंदी वातावरणात संपन्न झाला असून मोठ्या संख्येने भजनी कलाकार उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले.