संविता आश्रमात ‘Mission आनंदाचे सूर’ उत्साहात संपन्न!

YONE Foundation च्या युवा टीमने संगीत, खेळ आणि संवादातून फुलवले आनंदाचे क्षण;
संस्थापक संदिप परब यांच्याकडून टीमचे मनापासून कौतुक
जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम, पणदूर येथे YONE Foundation च्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘Mission आनंदाचे सूर’ हा विशेष सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. संगीत, मनोरंजक खेळ, शायरी आणि मनमोकळ्या संवादाच्या माध्यमातून आश्रमातील रहिवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे सुंदर कार्य या युवा टीमने केले.
YONE Foundation चे संस्थापक समीर अशोक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शायरी आणि संगीताने झाली. त्यानंतर आश्रमातील रहिवाशांसाठी विविध मनोरंजक खेळ घेण्यात आले. युवा सदस्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधत त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेतले. संगीत, हास्यविनोद आणि सामूहिक सहभागामुळे संपूर्ण आश्रम परिसर आनंदमय झाला.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समाजसेवेचा एक वेगळा दृष्टिकोन यातून अनुभवायला मिळाला. समाजातील निराधार, वंचित आणि ज्येष्ठ व्यक्तींना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर आपला अमूल्य वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
YONE Foundation चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम असून युवकांच्या सामाजिक सहभागातून सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी YONE Foundation च्या संपूर्ण युवा टीमचे तोंडभरून कौतुक केले. युवकांनी अत्यंत आत्मीयतेने, उत्साहाने आणि संवेदनशीलतेने आश्रमातील प्रत्येक व्यक्तीला आनंद देण्याचा केलेला प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे आश्रमातील रहिवाशांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर आपलेपणा आणि सन्मानाची भावनाही अनुभवता येते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी संविता आश्रमाच्या प्रांगणातील पानाफुलांचा सुंदर गुच्छ देऊन YONE Foundation च्या टीमचा सन्मान करण्यात आला. तसेच जीवन आनंद संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांची, आश्रमातील सेवाकार्याची आणि निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या कार्याची माहिती देणारे विशेष प्रेझेंटेशनही सादर करण्यात आले.
‘For the Youth. By the Youth. With the Youth.’ या ब्रीदवाक्याने प्रेरित YONE Foundation आणि ‘भिक नको, सन्मानाचे जीवन’ हा विचार घेऊन कार्यरत असलेली जीवन आनंद संस्था यांच्या या सुंदर सहकार्याने समाजसेवेत युवकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची प्रचिती दिली.
आनंदाचे सूर केवळ संगीताचे नव्हते, तर ते माणुसकीचे, आपुलकीचे आणि संवेदनशीलतेचे होते!
या कार्यक्रमप्रसंगी आश्रमातील युवा भगिनी राणी, अनुजा कुबल, श्रेया, आरती, शिल्पा यांनी उत्स्फूर्त गीत गायन केले.जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त जितेंद्र परब, किसन चौरे आणि व्यवस्थापक देऊ सावंत यांची यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी YONE फाऊंडेशन च्या टीम सह संविता आश्रमचे कोरगावकर, आशिष मुरुडकर, मयुरी अंगणे,सायली गोसावी, विद्या वायंगणकर यांनी विशेष मेहनत घेतली.






