कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या ‘जपलाला कनवटीचा’ काव्यसंग्रहाचे १८ रोजी प्रकाशन

डॉ.नंदकुमार मोरे, प्रवीण बांदेकर, अजय कांडर, डॉ. शरयू आसोलकर, डॉ.गोविंद काजरेकर, ॲड. संदीप निंबाळकर,मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती

मालवणी बोलीतील प्रसिद्ध कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या प्रभा प्रकाशन कणकवली यांनी प्रकाशित केलेल्या 'जपलाला कनवटीचा' काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार 18 मे रोजी सायं. ५ वा. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा नामवंत बोली भाषा अभ्यासक डॉ.नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम वाचन मंदिर आणि प्रभा प्रकाशनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नामवंत कादंबरीकार - कवी प्रवीण बांदेकर, सुप्रसिद्ध कवी आणि स्तंभ लेखक अजय कांडर, नामवंत कवयित्री, मालवणी बोलीभाषा अभ्यास डॉ. शरयू आसोलकर, नामवंत समीक्षक कवी प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर, श्रीराम वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आदिना निमंत्रित करण्यात आले आहे.
 कवयित्री कल्पना बांदेकर या मालवणी बोलीतील ज्येष्ठ कवयित्री असून सुमारे 40 वर्ष निष्ठेने मालवणी बोलीतून कविता- कथा आदी लेखन सातत्याने करत असतात. कोकणातील एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कल्पना बांदेकर यांचे अन्य ग्रंथ ही यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. मात्र त्यांच्या बोली भाषेतील कवितेला मराठी साहित्यातील अनेक मान्यवरानी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे.

‘जपलाला कनवटीचा’ काव्यसंग्रहाची ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी पाठराखण केली असून त्यात ते म्हणतात, “देठात्सून जप रे तिका फुलासारखी अरे मालवणी ती मालवणी’ असा मालवणीचा काळीज गाणा लिवणाऱ्या कल्पना बांदेकरचो ‘जपलाला कनवटीचा’ हयो कवनांचो संग्रह आता तुमच्यासमोर आसा. काळजाच्या बिजीकप्प्यात राखून ठेयले सगळे बरे-वायट आठवणी कल्पनान इतक्या वर्सांनी भायर काडल्यान नी तुमच्यासमोर हयो खेळ मांडल्यान. ही कवना वाचताना आपण कदी मॅडासारे हसत ऱ्हवलंव; तर कदी डोळयांत दुका येवन गप-गार निमूट होतलंव. मालवणी माणसा, तेंचा जगणा, तेंची बोलाचाली नी वागणा, तेंच्यो श्रध्दा-अंधश्रध्दा, मालवणी झाडापेडा नी तिखट-गोडा जा जा काय कनवटीक लावक गावात ता हया कवयित्रीन लावल्यान नी मग कनवट सोडून आपलो एक एक खणखणीत अनुभव आमच्या फुडयात ठेवल्यान. कल्पनाच्या कवितांचो हयो लकाकतो ऐवज मालवणी कवितांच्या परंपरेत खरोखरच महत्त्वाचो आसा. हया कवनांच्या कनवटीत तुमका फडफडीत ताज्या सुंगटासारी एक एक गाळ घालणारी आये गावतली. हया आवशीची आठव काडताना जेवा कवियीत्री म्हनता,”आये, तुज्या घराक लागलला दळीदार तू रसाळ फणसान झाकलंस”
तेवा आपलाव काळीज भरान येता. ही आवस कनवटीक सत्त्व जपान ठेवणारी आसा. हया कवनांतल्या पोरांच्या भुकेक आम्यांचो आदार आसा. ‘रिण’ हया कवितेतलो आवशी बापाशीक इसारनारो झील पश्चातापान ‘दुकाच्या झरीनी मी रडलंय’ असा शेवटी म्हनता. माणसाक माणसाची आफड कशी काय? असो प्रश्न पडणारी ही कवयित्री जेवा म्हणता की,
‘बायो मेला आणि आपल्या वांगडा आपली आफडय घेवन गेला.’ तेवा त्या काळातली एक अख्खी दलित पिढी आपल्या नदरेसमोर उबी ऱ्हवता. कल्पनाची ही जिती-जागती कवना माका भावली तशी तुमकाव भावतली ही खात्री आसा.तरी या कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!