नांदगाव सरपंच रविराज मोरजकर सह तिघांना सशर्त जामीन मंजूर

नांदगाव येथील मारहाण प्रकरण
संशयितांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
जमिनीच्या व वैयक्तिक वादातून मारहाण करून नांदगाव येथील सुरेश मोरये व कमलेश मोरये या पित्रापुत्रांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी नांदगाव सरपंच रविराज धोंडू मोरजकर, भूपेश धोंडू मोरजकर, केदार प्रकाश खोत यांना सह मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. जे. पाटील यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपींच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
याबाबत सुरेश मोरये यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोरजकर व मोरये यांच्यात २५ वर्षांपासून जमिनीवरून वाद सुरू आहे. आरोपी करत असलेल्या बांधकामाबाबत लेखी आक्षेप नोंदविला होता. त्या रागातून बुधवारी १४ मे रोजी फिर्यादी व त्यांचा मुलगा एका हॉटेलकडे उभे असताना आरोपी तेथे आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला लाकडी रीप व काठीने जबर गंभीर दुखापत करणारी मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये फिर्यादीच्या डाव्या व उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर कमलेश हा गंभीर जखमी होत डाव पाय फॅक्चर झाला होता. याबाबत त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार चालू होते. याप्रकरणी आरोपीविरूद्ध बीएनएस कलम ११८ (१), ११८ (२) व ३ / ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना १६ मे रोजी अटक करून गुन्ह्यातील साहित्य जप्त केले होते. आरोपी १७ मे पासून न्यायालयीन कोठडीत होते. बुधवारी जामिन अर्जावर सुनावणी होत आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत पोलीस स्टेशनला हजेरी लावणे, असा गुन्हा पुन्हा न करणे व सरकारी पश्नाच्या पुराव्यात हस्तक्षेप न करण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.