लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केला सत्कार

तलाठी कंठाळे व मंडळ अधिकारी हांगे यांची चौकशी थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट?

माजी आमदार वैभव नाईक यांचा जोरदार आरोप

     महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल ११ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. ते हेलिकॉप्टर मधून उतरले तेव्हा त्यांचा सत्कार जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी यांनी करणे गरजेचे होते. अथवा महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला पाहिजे होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जामिनावर मुक्त असलेल्या दोन लाचखोर तलाठ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला आहे. लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून  लाचखोर कर्मचाऱ्यांना राजश्रय मिळवून देण्याचा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा होता का? आणि कोणाच्या वरदहस्तामुळे या लाचखोर कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याची संधी देण्यात आली. बीडप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लाचखोर कमर्चारी सापडत आहेत. या लाचखोर कर्मचाऱ्यांचा नेमका आका कोण असा सवालही या सत्काराच्या निमित्ताने उपस्थित होत असून  देवेंद्र फडणवीस यांचे लाचखोर कमर्चाऱ्यांना अभय आहे का? असा सवाल कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे. 

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाल घालून सत्कार करणारे वायंगणीचे तलाठी  विठ्ठल वैजीनाथ कंठाळे यांनी २२ मार्च २०२२ रोजी  वाळू उपशावर कारवाई न करण्यासाठी तोंडवळी गावातील वाळू व्यवसायिकाकडून २५ हजाराची लाच मागितली होती. तर खरेदी खताची सातबारावर नोंद मंजूर करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी  कसालचे मंडळ अधिकारी संदीप पांडुरंग हांगे यांनी दहा हजाराची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही लाच घेताना रंगेहात पकडून अटक केले होते. त्यानंतर तलाठी  विठ्ठल कंठाळे व मंडळ अधिकारी संदीप  हांगे यांना निलंबित करण्यात आले.आता त्यांची  जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. या दोन्ही तलाठ्यांची अवैध वसुली संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी सुरू असून ती चौकशी थांबविण्यासाठीच तलाठ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि अशा लाचखोर तलाठ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.  त्याचबरोबर अवैध वाळू, सिलिका मायनिंग आणि महसूल विभागांतर्गत कामे करण्यासाठी  महसूल यंत्रणेला कोट्यवधी रुपयांचे हप्ते  मिळत आहेत.याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवीत आहोत. मात्र अशा लाचखोर  कर्मचाऱ्यांना राजाश्रय  देऊन त्यांच्यामाध्यमातून हप्ते वसुली केली जात आहे का असा संशय वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे.
error: Content is protected !!