कर्मचाऱ्यांबाबत निश्चितच सकारात्मक निर्णय होईल – विजय चव्हाण

बीडीओ विजय चव्हाण यांनी घेतली संपकाऱ्यांची भेट
निलेश जोशी । कुडाळ : प्रशासन हे संवेदनशील आहे तुमच्या भावना शासनापर्यंत पोचल्या आहेत. निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, असे प्रतिपादन पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी केले. श्री. चव्हाण यांनी आज संपात सहभागी झालेल्या कुडाळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
कुडाळ पंचायत समितीचा लेखा, आरोग्य, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, लिपिक, वाहन चालक ,परिचर, शाखा अभियंता, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यानी मूलभूत मागण्यांसाठी गेले सात दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे आज या आंदोलन स्थळी पंचायत समितीचे प्रशासक गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले, तुमच्या भावनांची आम्हाला कदर आहे. या ठिकाणी तुम्ही कार्यरत असताना आज सात दिवस संपामध्ये सहभागी आहात. निश्चितच प्रशासन संवेदनशील आहे. तुमच्या भावना शासनापर्यंत पोचल्या आहेत. सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे श्री चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान आंदोलनाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी आमची पेन्शन सरकारला टेन्शन कर्मचारी संघटनेचा विजय असो, एकच मिशन जुनी पेन्शन, हम सब एक है आदी घोषणानी परिसर दणाणून सोडला. ग्रामसेवक युनियनचे सचिव संतोष पालव व लेखा विभागाचे राजू खेत्री यांनी प्रशासक विजय चव्हाण यांनी कर्मचाऱ्याच्या आंदोलनस्थळी भेट दिली कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या हे निश्चितच आम्हाला प्रेरणादायी आहे. प्रशासक श्री चव्हाण हे नेहमीच कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी विधायक निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत राहिले आहेत त्यांनी आंदोलनच्या ठिकाणी भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ.