मृत्यू येईल एवढी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तिघे निर्दोष

आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
नागवे भटवाडी येथील नंदकिशोर भिवा सुतार याला पुर्ववैमनश्यातून मृत्यू होईल एवढी गंभीर मारहाण केल्याच्या आरोपातून तेथीलच शिवराम अशोक सातवसे, शशिकांत अशोक सातवसे व त्यांची आई अश्विनी अशोक सातवसे यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एच. शेख यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपर्षीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
फिर्यादी नंदकिशोर सुतार याच्या शेतजमिनीत आरोपीच शिवराम व शशिकांत यांचे वडिल अशोक यांनी बांधकामासाठीची वाळू व खडी न विचारता टाकली होती. याबाबत फिर्यादीने तंटामुक्त समिती व पोलिसांकडे तक्रार केली होती. या रागातून दि. ११ मे २०१७रोजी फिर्यादी बाजाररहाट करून कणकवली येथून परत घरी येत असताना सकाळी ११.३० वा. च्या सुमारास भटाचा आडा या एकाकी जंगली पायवाटेवर त्याला आरोपींनी अडवून बांबूच्या दंड्यानी मारहाण केली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच पाठीच्या बरगड्या तुटल्या व दोन्ही पाय फॅक्चर झाले. आरडाओरड ऐकून तसेच शोभा शिरसाट यांच्या सांगण्यावरून त्याची पत्नी सौ. नम्रता ही धावत आली, त्यावेळी आरोपी तेथे फिर्यादीला दांड्याने मारहाण करत होते. त्यानंतर फिर्यादीला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून नंतर जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. तिथे फिर्यादीवर सहा महिने उपचार करण्यात आले. वैद्यकीय उपचार वेळेत झाले नसते तर फिर्यादीला आपले प्राण गमवावे लागले असते.
याबाबत दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३२६, ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली. तसेच गुन्हयात वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली सुनावणीत फिर्यादी घटनेवेळी त्याचे शेजारी पांडू सातवसे यांच्या रिक्षातून घरी आला, असे स्पष्ट झाले. तसेच फिर्याद देण्यास झालेला विलंब, वैद्यकीय पुरावा शाबित न होणे, तपासातील त्रुटी आदी कारणास्तव आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
कणकवली /प्रतिनिधी