समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत महिला दिनानिमित्त आदिवासी व दलित वृद्ध महिलांसाठी आनंद मेळावा संपन्न

समता शिक्षण संस्था, पुणे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प, धुळे अंतर्गत दि. १२ मार्च २०२५ ला विश्वासनगर, कुंडाणे येथे महिला दिनानिमित्त आदिवासी, दलित वृद्ध महिलांसाठी आनंद मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आदिवासी वस्ती विश्वासनगर, कुंडाणे व भिल्ल वस्ती, मोराणे येथिल ५० वृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या. सदर कार्यक्रमासाठी प्रा. विलास वाघ मेमोरियल फाउंडेशन, पुणे यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली होती..
आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉ. जालिंदर अडसुळे (सचिव, समता शिक्षण संस्था, पुणे व संचालक डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी प्रकल्प धुळे), कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय प्रा. रचना अडसुळे (समन्वयक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रामीण व शहरी विकास प्रकल्प धुळे) यांनी केले. कालकथित प्रा. विलास वाघ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले व कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय प्रा. रचना अडसुळे यांनी केले.
उद्घाटन प्रसंगी प्रा. विलास वाघ यांच्या जीवनावर व सामाजकार्यावर आधारित चित्रफित “प्रबोधन पर्व ” दाखविण्यात आली. यावेळी श्रीमती सुलताना ईसा शहा (धुळे व नंदुरबार शहर समन्वयक, माया केयर फाउंडेशन, पुणे), प्रकल्पाचे कार्यक्रम अधिकारी श्रीमती प्रा. सुनिता पाटील, श्री गणेश उफाडे, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती. जयवंताबाई वाघ इत्यादी मान्यवर उपस्थित होते. चित्रफितावर डॉ. अडसुळे यांनी महिलांसोबत चर्चा केली. ते म्हणाले कि विलास वाघ मोरणे या छोट्याशा गावात जन्माला आले व आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्रभर उमटवला. त्यांनी सुरु केलेल्या संस्था समाजातील गरीबातील गरीब घटकांपर्यंत पोहोचल्या आहेत. ते संपूर्ण आयुष्य सामाजासाठी जगले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक डॉ. जालिंदर अडसुळे यांनीही मेळाव्यातील महिलांशी संवाद साधतांना म्हणाले कि, तुम्ही या प्रकल्पाला जोडल्या गेल्यापासून तुमच्यात काय बदल झाला ते सांगायचे आहे. त्यावेळेला प्रकल्पातील महिला म्हणाल्या कि, सुरुवातीला आम्ही आमचे नावही सांगायला घाबरत होतो, आमचे हक्क अधिकार काय आहेत ते आम्हाला ठाऊक नव्हते, आम्हाला कुठ्ल्यास योजनेची माहिती नव्हती व तसा लाभ हि मिळत नव्हता परंतु आता आम्ही या प्रकल्पात जोडल्या गेल्यापासून आमच्या मध्ये खूपच बदल झाला आहे. आम्ही ग्रामसभेत जाऊन लागलो, आमचे प्रश्न मांडू लागलो तसेच आमच्या समस्या काय आहेत ते स्वतः सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. प्रकल्पातील वृद्ध आपले मत व्यक्त करतांना म्हणाले कि, प्रकल्पाला जोडल्या गेल्यापासून आम्ही आनंदी राहतो. आमच्यासाठी दर महिन्याला चायमस्ती कार्यक्रम घेतला जातो. त्यात आम्ही पारंपारिक खेळ खेळतो, आरोग्य शिबिरे, शासकीय विविध योजनांविषयी माहिती मिळत असते. असे मत वृद्धांनी संवाद साधतांना व्यक्त केले.
पहिल्या सत्राच्या शेवटी वृद्धांसाठी कला उपक्रम’ म्हणून रेखाचित्र स्पर्धा घेण्यात आली. यात वृद्धांनी त्यांच्या कल्पनेने रेखाचित्रे आनंदाने तयार केली. ज्या महिला त्यांच्या आयुष्यात कधीही शाळेत गेलेल्या न्हवत्या त्या चित्र काढण्या मध्ये रमून गेल्या होत्या.
भोजना नंतर दुपारच्या सत्रात सुलताना ईसा शहा (धुळे व नंदुरबार शहर समन्वयक, माया केअर फाउंडेशन, पुणे) यांनी वृद्धांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना विषयी महिलांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी श्रावणबाळ निवृतीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, बस भाड्यात राज्य परिवहन महामंडळ सवलत योजना, जेष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना अशा विविध योजनाविषयी माहिती दिली.
महिलांसाठी गायन स्पर्धा ही घेण्यात आली. त्यात महिलांनी आदिवासी, अहिराणी पारंपारिक गाणी सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकल्पाच्या महिलांशी संवाद आणि अभिप्राय घेण्यात आला. त्यात महिलांनी आपले मत व्यक्त करतांना म्हटले कि, अशा कार्यक्रमामुळे आम्हाला आंनद मिळतो. व प्रकल्प आमच्यासाठी नवनविन कार्यक्रम घेत असतो. त्यामुळे आमचा उत्साह ही वाढतो.
याप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी मयुरी जाधव हिने सूत्रसंचालन तर आभार प्रा. सुनिता पाटील यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. सुनिता पाटील, श्री गणेश उफाडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयाचे क्षेत्रकार्याचे विद्यार्थी रोहन पाडवी, शिल्पा पावरा, लक्ष्मी बागुल यांचे सहकार्य लाभले.