ओसरगाव येथे महिलेला जाळण्याच्या घटनेत फॉरेन्सिक टीम कडून नमुने घेतले

घटनास्थळी पोलिसांकडून दिवसभर कडेकोट बंदोबस्त
महिलेची ओळख पटेना, पोलिसांची पथके तपासात सक्रिय
कणकवली तालुक्यात ओसरगाव येथे महिलेचा घातपात झाल्याची घटना घडली झाल्यानंतर आज मंगळवारी सायंकाळच्या सत्रात कोल्हापूर येथील फॉरेन्सिक टीम कडून घटनास्थळाची पाहणी करून नमुने गोळा करण्यात आले. फॉरेन्सिक टीम कडून या भागातील सर्व बाबींचे निरीक्षण करण्यात आले असून, काही महत्त्वाचे नमुने गोळा करण्यात आल्याने आज दिवसभर घटनास्थळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. रात्रीपासूनच या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित होते. या महिलेचा खून करून तिला नंतर जाळण्यात आले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनास्थळी ज्या ठिकाणी महिलेला जाळण्यात आले त्या ठिकाणी चा भाग हा फॉरेन्सिक टीम येईपर्यंत सील करण्यात आला होता. ही महिला कोण हे अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी तिच्या पायात आढळलेले मोठ्या नक्षीचे पैंजण कानातले कुडे, व हातातील बांगड्या यावरून सदरची महिलाही चिरेखन किंवा अन्य ठिकाणी कामगार म्हणून आलेली होती का? ते देखील तपासण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. या महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला त्या ठिकाणी एक पाय व अर्धवट जळालेल्या स्थितीत शिल्लक होता. तसेच शरीरातील डोक्याचा व हाडांचा भाग शिल्लक होता. बाकी सर्व मृतदेह जळून खाक झाला होता. त्यामुळे या गुन्ह्याचे तपास करणे हे कणकवली पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान आज कणकवलीतील स्मशान भूमीत हा महिलेचा मृतदेह दफन करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी पथके नेमली असून या पथकांच्या माध्यमातून तपास सुरू असल्याचे जगताप यांनी सांगितले. आज दिवसभरात ज्या चर्चा व शक्यता वर्तवण्यात आल्या त्याचा तपास उद्यापासून करण्यात येणार आहे असेही जगताप यांनी सांगितले.
दिगंबर वालावलकर /कणकवली