पंचशील विकास मंडळ खारेपाटण यांच्या वतीने प्रकाश अकिवटे व अनंत चव्हाण यांचा सन्मान

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बुधवार दी.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी खारेपाटण येथील पंचशील विकास मंडळ खारेपाटण व संघमित्रा महिला मंडळ खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण हायस्कूलचे माजी सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक श्री प्रकाश आण्णासाहेब आकिवटे तसेच खारेपाटण येथील केश कर्तनालयाचा पारंपरिक व्यवसाय असणारे श्री अनंत भिकाजी चव्हाण यांचा त्यांनी केलेल्या प्रेरणादायी सामाजिक कार्याची दखल घेऊन मंडळाचे माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन दानशूर व्यक्तिमत्व म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचशील विकास मंडळ खारेपाटण या मंडळाचे खजिनदार श्री संदीप पाटणकर,युवा कार्यकर्ते श्री मकरंद पाटणकर, भूषण गोवळकर,ललित पाटणकर, सागर पोमेडकर,बाळकृष्ण पाटणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक श्री प्रकाश आकिवटे सर हे दिव्यांग असून खारेपाटण हायस्कूल या शाळेत नोकरी करून शाळेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर ज्या शाळेने आपल्याला मोठे केले. त्या शाळेचे ऋन व्यक्त करताना सामाजिक बांधिलकी जपत सेवानिवृत्त मधील काही रक्कम शाळेला दान केली आहे.एका शिक्षकाचे शाळेबद्दल असलेले ऋणानुबंध यामधून दिसून येतात.म्हणून त्यांचा कार्याचा गौरव व्हावा. या उद्देशाने आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी मंडळाच्या वतीने त्याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीचा आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
तर खारेपाटण येथे एक छोटासा सलून व्यवसाय करणारे श्री अनंत चव्हाण यांनी देखील आपल्या चार मुलांची लग्न केली असून या चारी मुलांच्या लग्नात नातेवाईक व मित्रमंडळी कडून मिळालेला सर्व आर्थिक रकमेचा आहेर अर्थात भेट म्हणून मिळालेले एकूण अडीज लाख एवढी सर्व रक्कम जिल्ह्यातील अनाथ व वृद्ध आश्रमासाठी दान करून समाजात एक वेगळा सामाजिक दातृत्वाचा संदेश दिला आहे.त्यांच्या देखील कार्याची मंडळाने दखल घेऊन श्री अनंत चव्हाण यांच्या संपूर्ण परिवाराचा आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.