सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निर्दोष

संशयित आरोपीच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद
येथील शासकीय विश्रामगृहात कोरोना कलावधीत स्वॅब कलेक्शन सेंटरमधील कक्ष सेवक विजय गणपती चौरे याला शिवीगाळ व मारहाण करत शर्ट फाडला. तसेच त्याला धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपी नीतेश शशिकांत भोगले (कलमठ-नाडकर्णीनगर) याची अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एस. एस. जोशी यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले.
३० मे २०२० रोजी आरोपी नीतेश भोगले याच्या बहिणी मुंबईहून कलमठ येथे आल्या होत्या. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांची स्वॅब टेस्ट अनिवार्य होती. त्यातील एका बहिणीला कोरोनाची लक्षणे दिसत होती. वैद्यकीय अधिकारी संतोष चौगुले यांनी सकाळी त्यांचे स्वॅब घेतले. तसेच आरोग्य कर्मचारी संभाजी नांदगावकर यांनी त्यांची सोय एका रुममध्ये केली. परंतु, दोघींपैकी एकीलाच लक्षणे असल्याने त्यांनी दोन स्वतंत्र रुमची मागणी केली. त्यावेळी स्वतंत्र रुम नसल्याचे कारण देत डॉ. पोळ यांनी त्यांची व्यवस्था फोंडाघाट येथील कृषी विद्यालयात करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, त्याला नकार देत विश्रामगृहातच राहण्याचा आग्रह धरला. त्यानंतर सायं. ४ वा. फिर्यादी विजय चौरे स्वॅब सेंटर बंद करून निघून गेले. सकाळपासून रात्री ११ वा. पर्यंत दोन्ही मुली विश्रामगृहासमोरील पारावर बसून होत्या. त्यावेळी त्यांचा भाऊ आरोपी नीतेश भोगले याने तहसिलदारांना फोन केला. त्यावेळी फिर्यादी व दुसरा कक्षसेवक तेथे आले. त्यावेळी तेथे पोलीस कर्मचारी वैभव कोळी उपस्थित होते. आरोपीने फिर्यादीला रुमच्या चाव्या आणल्या का असे विचारले असता डॉ. टाक येत आहेत. त्यांच्याशिवाय मी चाव्या देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यावर चिडून जाऊन आरोपीने शिवीगाळ करत पोलीसांसमक्ष मारहाण करत शर्ट फाडला. म्हणून फिर्यादीने पहाटे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाख करण्यात आला होता. सुनावणीत सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, फिर्यादीस झालेला विलंब, तपासातील त्रुटी यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
कणकवली प्रतिनिधी