मोठी स्वप्ने आणि सुसंगत कृती यामुळे सामाजिक संस्थेला उभारी येते- डॉ महेश अभ्यंकर
![](https://kokannow.in/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-06-at-1.02.35-PM-scaled.jpeg)
टोपीवाला हायस्कूल मालवण माजी विद्यार्थी संघटनेचा ‘व्हिजन वर्कशॉप’ २ फेब्रुवारी २०२५ रोजी हॉटेल रेसिडेन्सी, अंधेरी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला. टोपीवाला हायस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ महेश अभ्यंकर यांनी या कार्यशाळेचे आयोजन करून सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत माजी विद्यार्थ्यी संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने काय व कसे प्लॅनिंग करायला हवे या विषयावर चर्चासत्र घेतले. सिंधुदुर्ग, पुणे, अलिबाग, मुंबई येथून आलेल्या २८ माजी विद्यार्थ्यी/विद्यार्थिनीनी या कार्यशाळेस उपस्थित राहून आपली मते मांडली. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेले व प्रगल्भ अनुभव असलेले विद्यार्थी एकत्र आल्यामुळे विचारांना चालना मिळाली.
संस्थेची उद्दिष्टये, मूल्ये, दहा वर्षाचे ध्येय, कृतिआराखडा अश्या विविध मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. माजी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे आठ गट पाडून विविध विषयावर आधारित उद्दिष्टांवरील मुद्दे, आव्हाने यावर प्रश्नावली देण्यात आली. सर्व गटांचा १००उस्फूर्त प्रतिसाद होता. आठही गटांनी कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात आपापल्या विषयांवर आधारित कोणकोणते उपक्रम, कार्यशाळांचे आयोजन करता येईल यावर प्रेझेंटेशन दिले. एकाच गावात, एकाच शाळेत शिकलेले विद्यार्थी एकत्र आल्याने वातावरण ही मैत्रीपूर्ण होते.
“शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी यांच्यावर सकारात्मक परिणाम करणारे प्रकल्प निवडा, नियोजनात सुसूत्रता आणा, प्रकल्पांची अंमलबजावणी सुकर करण्यासाठी मनुष्य बळ, निधी संकलन याची सांगड घाला आणि सर्वसमावेशक सांघिक नेतृत्वाच्या जोरावर मोठी झेप घ्या” असे विचार डॉ महेश अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
‘व्हिजन वर्कशॉप’ खरोखरीच संघटनेच्या कामासाठी योग्य दिशा दाखवणारा नकाशा ठरला. सर्व माजी विद्यार्थ्यांना नव्या जोमाने काम करण्यास नक्कीच ही कार्यशाळा प्रेरणादायी ठरली.