राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचे यश खुल्या गटात कलाशिक्षक मंदार चोरगे तर शालेय गटात अश्मी भोसले प्रथम

वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग अकराव्या वर्षी ‘अश्वमेध’ महोत्सवातंर्गत खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन
विजेत्यांचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी केले अभिनंदन
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्या वतीने सलग अकराव्या वर्षी ‘अश्वमेध’ महोत्सवातंर्गत खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सदर स्पर्धा ‘खुल्या’ व ‘शालेय’ अशा दोन गटात आयोजित केलेली होती.
आधुनिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रिल्स चा प्रभाव वाढत चालला आहे.युवा वर्गावर रिल्स च्या माध्यमातून अनैतिक वर्तनाचे संकट निर्माण होत असल्याचे दिसत आहे. मनोरंजनाच्या नावाखाली भडक सामग्री आणि अश्लीलता वाढत असल्यामुळे समाजातील मूल्यांची हानी होऊ शकते. या प्रकारच्या सामग्रीची सहज उपलब्धता आणि त्वरित लोकप्रियता यामुळे व्यक्तीचे वर्तन बदलत आहे. रिल्स केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही,तर ते स्वैराचाराचे गढ बनत चालले आहे. यामुळे युवा पिढीला अधिक जागरूक आणि विचारशील बनण्याची गरज आहे. एकत्रितपणे, या संदर्भात सामाजिक मूल्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि सत्यता पडताळून पाहण्यासाठी खुल्या गटासाठी ‘रिल्स स्वैराचाराला आमंत्रण देतायेत का?’ या विषयावर निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते तर आजच्या काळात आपल्या समाजात आणि देशात विविध बदल होत आहेत. काही गोष्टी टिकून राहतात, तर काही बदलतात. परंतु इतिहासाच्या पानांवर एक अशी व्यक्ती आहे जिने आपल्या कर्तृत्वाने, नेतृत्वाने आणि समर्पणाने सगळ्यांना प्रेरित केले आहे. त्या महापुरुषाचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर आज शिवराय असते, तर त्यांची कृती आणि विचार कसे असते, याची कल्पना करणे,आपल्या समाजाची दिशा कशी असावी, याबद्दल विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या शौर्याच्या आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या प्रकाशात आपण आपल्या जीवनाच्या आणि समाजाच्या समस्यांवर कसे मात करू शकतो, हे जाणून घेणे गरजेचे आहे.याबद्दल आपले विचार व्यक्त करण्यासाठी इयत्ता १० वी पर्यंतच्या शालेय गटासाठी आज शिवराय असते तर हा विषय देण्यात आला होता.
या स्पर्धेत वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल चे कलाशिक्षक मंदार सदाशिव चोरगे यांनी खुल्या गटातून प्रथम क्रमांक पटकावला तर शालेय गटात अश्मी प्रविण भोसले हिने प्रथम क्रमांक पटकावला व शिवानी रत्नाकर फुटक हिने द्वितीय क्रमांक पटकावला. राज्यभरातून अनेक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रशालेचे कलाशिक्षक मंदार चोरगे व विद्यार्थीनी अश्मी भोसले, शिवानी फुटक यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, मुख्याध्यापक बी.एस.नादकर, प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व पालक यांनी अभिनंदन केले.