‘विद्युत वितरण ‘ चा जनतेच्या जीवाशी खेळ

उन्नेयी बंधाऱ्यावरील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या धोकादायक

‘तिलारी ‘ कडून पत्रव्यवहार ; तरीही दुर्लक्ष

लोंबकळणाऱ्या धोकादायक वीज वाहिन्यांकडे दुर्लक्ष करून विद्युत वितरण कंपनी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करत आहे.
तेरवणमेढे येथील उन्नेयी बंधाऱ्यावरील खांब वाकल्याने ११ केव्ही लाईनच्या विद्युत वाहिन्या रस्त्यावर आल्याने धोकादायक बनल्या आहेत.त्या मुख्य रस्त्यावर लोंबकळत असल्याने कुणाचाही बळी जाऊ शकतो.याकडे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे.त्यामुळे कोनाळकट्टा येथील तिलारी शीर्षकामे उपविभाग क्रमांक २ चे उपविभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी पुन्हा एकदा साटेली भेडशी येथील सहायक अभियंत्यांना पत्र पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
त्यांनी पत्रात म्हटले आहे की, तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या मुख्य धरणापासून खळग्यातील दगडी धरणाकडे जाणा-या लघु विद्युत वाहिनीचे ५ खांब वाकल्यामुळे ब-याच ठिकाणी विद्युत वाहिनीच्या तारा लूज पडल्या आहेत. वाकलेल्या खांबांच्या जागी नवीन खांब घालून लोंबकळत असलेल्या विद्युत वाहिन्या ताणून पूर्ववत करण्याबाबत आपणांस लेखी व तोंडी कळविले आहे. तसेच आपणांस सदरची दुरुस्ती करणेबाबत वारंवार भेटून तोंडी सूचनाही दिलेल्या आहेत.
सध्या तेरवणमेढे उन्नैयी बंधारा येथे मुख्य रस्त्यावरील ११ के.व्ही. वाहिनी ही लुज पडुन खाली आली आहे. तेरवणमेढे उन्नैयी बंधा-यावरुन वाहनांची बाबरवाडीकडे नेहमी ये जा सुरु असते. तसेच बंधा-याच्या दुरुस्तीसाठी बंधा-याकडे देखील वाहनांची नेहमी ये जा सुरु असते या वाहनांना ही वाहिनी लागून अपघात होऊ शकतो. तसेच तेरवणमेढे येथील ट्रान्सफॉर्मरच्या केबल गंजलेल्या असून पुर्णपणे खराब झालेल्या आहेत. सोबत छायाचित्रे जोडण्यात येत आहेत. तरी तेरवणमेढे बंधा-याजवळील मुख्य रस्त्यावरील लोंबकळत असलेल्या ११ के. व्ही. वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मरच्या केबल ताबडतोब बदलून दुरुस्त करण्यात यावी अन्यथा कोणताही अपघात झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणांवर राहील, याची नोंद घ्यावी असेही त्या पत्रात म्हटले आहे.

अधिकाऱ्यांची बेपर्वाई थांबणार कधी?

विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी सर्वसामान्य माणसांशी अनेकदा असंवेदनशीलतेने वागतात हे सगळ्यांना माहीत आहे.पण; त्यांच्या बेपर्वाईमुळे कुणाचा जीव जाऊ शकतो हे माहीत असूनसुद्धा ते त्यांना लिहिलेली पत्रे कचराकुंडीत टाकतात,त्यावर काहीही कारवाई करत नाही हे संतापजनक आहे.वरिष्ठांनी आणि वीज मंत्र्यांनी याची दखल घेण्याची गरज आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!