पालकमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर अवैध व्यावसायिकांची तळमळ वाढली!

कणकवलीत आज मटक्याच्या स्टॉलवर पोलिसांकडून तपासणी

अजून काही दिवस अवैध व्यवसाय बंद राहण्याचे संकेत

“व्हाट्सअप द्वारे काम” घेणारे देखील पोलिसांच्या रडारवर

सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश दिल्यानंतर त्याचे पडसाद आता कणकवलीत उमटू लागले आहेत. कणकवलीत आज बुधवारी कणकवली पोलीस स्टेशनच्या “खबऱ्यांचे स्ट्रॉंग नेटवर्क” असलेल्या दोन पोलिसांकडून कणकवली व कलमठ परिसरातील पान स्टॉल वर व्हिजिट करत मटका, गुटखा याचा अन्य अवैध व्यवसाय सुरू आहेत का? याची तपासणी करण्यात आली. तसेच त्याचा अहवाल देखील वरिष्ठ कार्यालयाला गोपनीय रित्या पाठवण्यात आल्याची खात्रीशीर सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान अद्याप काही जणांकडून व्हाट्सअप द्वारे मटका घेण्याचे काम सुरू असून, ते देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. पण स्टॉलवर घेतला जाणारा खुलेआम मटका मात्र गेले काही दिवस बंद आहे. कणकवली पोलिसांनी आज बुधवारी सकाळपासूनच कणकवलीतील अनेक स्टॉलवर व्हिजिट करत मटक्याबाबत खातरजमा केली. यावेळी अवैध व्यवसाय सुरू असल्यास आता खैर नाही असा इशारा देखील दिला. दरम्यान कणकवलीत या दोन पोलिसांकडे ही जबाबदारी देण्यात आली होती हे दोन्ही पोलीस कणकवलीतील खबऱ्यांची नेटवर्क असणारे म्हणून ओळखले जातात. आजच्या या व्हिजिट व एकूणच कारवाईच्या भीतीने याचे पडसाद पुढील काही दिवस तरी उमटताना दिसणार आहेत. गेल्या अनेक वर्षांनंतर अशा प्रकारे सलग मटका कारवाईच्या भीतीपोटी बंद राहिल्याने मात्र अवैध व्यवसायिकांमध्ये तळमळ वाढली आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!